गडचिरोली जिल्ह्यात आरोग्यसेवा सलाइनवर

सुरेश नगराळे
बुधवार, 13 डिसेंबर 2017

गडचिरोली - जिल्हा परिषदेअंतर्गत येणाऱ्या आरोग्य विभागातील विविध संवर्गांतील शंभरावर पदे रिक्‍त आहेत. त्यामुळे ग्रामीण भागातील आरोग्यसेवेवर विपरीत परिणाम पडला आहे. ग्रामीण भागातील लोकांना गावपुजारी व मांत्रिकांचा उपचारासाठी आधार घ्यावा लागत असल्याचे विदारक चित्र दिसून येत आहे.

गडचिरोली - जिल्हा परिषदेअंतर्गत येणाऱ्या आरोग्य विभागातील विविध संवर्गांतील शंभरावर पदे रिक्‍त आहेत. त्यामुळे ग्रामीण भागातील आरोग्यसेवेवर विपरीत परिणाम पडला आहे. ग्रामीण भागातील लोकांना गावपुजारी व मांत्रिकांचा उपचारासाठी आधार घ्यावा लागत असल्याचे विदारक चित्र दिसून येत आहे.

गडचिरोली जिल्हा परिषदेअंतर्गत आरोग्य विभागातील विविध पदे रिक्‍त आहेत. यामध्ये वर्ग अ, ब संवर्गातील एकूण १७९ मंजूर पदांपैकी १०१ पदे भरण्यात आली. ६८ पदे रिक्‍त असल्याची माहिती जिल्हा परिषद उपाध्यक्ष कंकडालवार यांनी दिली. यामध्ये वर्ग १ अंतर्गत जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांची पदे भरण्यात आली. अतिरिक्‍त जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांचे १ पद, सहायक जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांचे १ पद, सहायक संचालक कुष्ठरोग पद भरण्यात आले आहे. जिल्हा माताबाल संगोपन अधिकारी १ पद, जिल्हा क्षयरोग अधिकाऱ्याचे १ पद रिक्‍त आहे. तर वर्ग २ अंतर्गत प्रशासकीय अधिकारी १, सांख्यिकी अधिकारी १, जिल्हा विस्तार अधिकारी गट अ ची १२ पदे मंजूर असून यापैकी केवळ ४ पदे भरण्यात आलीत. तर ८ पदे रिक्‍त आहेत. यामध्ये सिरोंचा, कोरची, मुलचेरा, कुरखेडा, चामोर्शी, अहेरी, एटापल्ली, भामरागड या तालुक्‍यांतील रिक्‍त पदांचा समावेश आहे.

वैद्यकीय अधिकारी गट ‘अ’ ची एकूण ७५ पदे मंजूर केली आहेत. यातील ४५ पदे भरण्यात आली, तर ३० पदे रिक्‍त आहेत. यामध्ये प्राथमिक आरोग्य केंद्र झिंगानूर, प्राथमिक आरोग्य पथक जारावंडी, फिरते आरोग्य पथक भामरागड, भाकरोंडी, पळसगाव, कमलापूर, भेंडाळा, बुर्गी, देऊळगाव, अंगारा, पेंढरी, कोनसरी, वडधा, मालेवाडा, मेंढाटोला, आमगाव, तोडसा, महागाव, वैरागड, सावंगी, पोर्ला, बोकसा, आरेवाडा, कुनघाडा, देलनवाडी, महागाव, सुंदरनगर आदी गावांतील प्राथमिक आरोग्य केंद्रे व पथकांतील अनेक पदे रिक्‍त आहेत. वैद्यकीय अधिकारी गट ब करिता एकूण ७३ पदे मंजूर असून यापैकी केवळ ५० पदे भरण्यात आली. २३ पदे अद्याप रिक्‍त आहेत. यामध्ये नरसिंहापल्ली, देचलीपेठा, घोट, कोटमी, जिमलगट्टा, मोयाबिनपेठा, मन्नेराजाराम, वडधा, गट्टा, आरेवाडा, ताडगाव, कसनसूर, पेरमिली, कोरेगाव, लाहेरी, पोटेगाव, बोटेकसा, भाकरोंडी, कोठी, वैरागड, कुरुंडीमाल, गोडलवाही, पिसेवडधा आदी आरोग्य केंद्रांचा समावेश आहे.

गडचिरोली जिल्ह्यातील अनेक दुर्गम गावांमध्ये आरोग्य केंद्राअभावी लोकांना १५ ते २० किलोमीटर अंतरावर असलेल्या तालुक्‍याच्या ठिकाणी पायपीट करावी लागत आहे. रुग्णवाहिका तसेच अन्य खासगी वाहनसुद्धा वेळेवर उपलब्ध होत नाही.

यामुळे रुग्ण गाव पुजारी, तसेच मांत्रिकांचा आधार घेतात. अनेक मार्गांवर रस्ते व पूल नसल्याने खासगी वाहनसुद्धा गावापर्यंत पोचत नाही. यामुळे काही गावांमध्ये रुग्णांना खाटांवर न्यावे लागत असल्याचे चित्र ग्रामीण भागामध्ये आहे.

Web Title: gadchiroli news health service issue