गडचिरोली पोलिसांनी केली दोन जहाल नक्षलवाद्यांना अटक, दोघे आले शरण 

मिलिंद उमरे 
Tuesday, 11 August 2020

जहाल नक्षलवादी यशवंत बोगा २००९ मध्ये टिपागड दलममध्ये भरती झाला होता. तो सध्या टिपगड दलमचा विभागीय समिती सदस्य (डीव्हीसीएम) होता. विविध पोलिस ठाण्यात त्याच्यावर 78 गंभीर गुन्हे नोंद आहे.

गडचिरोली : पोलिसांनी जिल्ह्यातील नक्षल चळवळीला बऱ्यापैकी नामोहरम केले असून नक्षलवाद्यांच्या विभागीय समितीचे सदस्य पतिपत्नी असलेल्या दोन जहाल नक्षलवाद्यांना अटक करण्यात आली, तर दोघांनी शरणागती पत्करली. 

सोमवारी (ता. १०) आयोजित पत्रकार परिषदेत यासंदर्भात सविस्तर माहिती देण्यात आली. पत्रकार परिषदेला पोलिस महानिरीक्षक महादेव तांबडे, पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे व इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. पोलिस अधीक्षक म्हणाले की, गडचिरोली पोलिसांनी टीपागड दलमचा विभागीय समिती सदस्य यशवंत उर्फ दयाराम अंकलू बोगा याला त्याची पत्नी विभागीय समिती सदस्य शारदा उर्फ सुमित्रा पितुराम नैताम हिच्यासह अटक केली.

अवश्य वाचा- पत्नी व मुलाला माहेरी सोडून बहिणीकडे जातो असे सांगितले अन् परतलेच नाही...
 

जहाल नक्षलवादी यशवंत बोगा २००९ मध्ये टिपागड दलममध्ये भरती झाला होता. तो सध्या टिपगड दलमचा विभागीय समिती सदस्य (डीव्हीसीएम) होता. विविध पोलिस ठाण्यात त्याच्यावर 78 गंभीर गुन्हे नोंद आहे. यात सहा पोलिसांसह १८ खुनांच्या, तर १० जाळपोळीच्या गुन्ह्यांचा समावेश आहे. 

अवश्य वाचा- टिपेश्वरलगतच्या `या` गावांतील नागरिक त्याच्या दहशतीत... कोण आहे तो? 
 

कंबरडेच मोडले.... 

पोलिसांनी नक्षलवाद्यांवरची पकड घट्ट केल्यामुळे दोन वर्षांत २ डीकेएसझेडसी, ८ डीव्हीसी, ४ दलम कमांडर व ३ दलम उपकमांडरच्या मुसक्‍या आवळल्या गेल्या. यातील काही चकमकीत ठार झाले, काहींना अटक झाली, तर काहींची शरणागती पत्करण्यात पोलिस यशस्वी झाले. तसेच या काळात ३५ नक्षलवाद्यांनी शरणागती पत्करल्याची माहितीही पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी दिली. 
संपादन ः राजेंद्र मारोटकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Gadchiroli police arrested two extremist Naxalites, Two surrendered