गडचिरोली : "त्या' गावांमध्ये अजूनही होते वीजचोरी

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 15 नोव्हेंबर 2019

- वीज कर्मचारी हतबल
- लाइनमनची कमतरता
- वीज वितरण कंपनीला आर्थिक फटका
- एका कर्मचाऱ्याकडे 10 ते 15 गावांचा कारभार

गडचिरोली : दुर्गम भागात मोठ्या प्रमाणात लाइनमची कमी असल्याने वीजतारांवर आकडे टाकून सर्रासपणे वीजचोरी केली जात आहे. यामुळे वीज वितरण कंपनीला महिन्यापोटी लाखो रुपयांचा आर्थिक फटका बसत आहे. एका कर्मचाऱ्याकडे 10 ते 15 गावांचा कारभार असल्याने त्यांना प्रत्येक गावाकडे लक्ष देता येत नाही. याच कारणाने वीज चोरी करण्याची संधी मिळत असून ग्राहकांनाही नियमित सेवा मिळत नसल्याची ओरड केली जात आहे.

गेल्या काही वर्षांपासून सातत्याने वीज बिलात वाढ होत असल्याने ग्रामीण भागात वीजचोरीचे प्रकार वाढत आहे. वीज वीजखांबावरथेट आकोडे टाकून विजेचा वार केला जात असल्याने लहान मुले, महिला तसेच वृद्धांसाठी धोक्‍याचे ठरत आहे. अनेक गावात विजेचे तार जमिनीवर खुले सोडून त्याचा वापर करण्यात येत आल्याची गंभीर बाब समोर आली आहे. परंतु गावात भांडणे नको म्हणून कोणीही तक्रार करीत नाही. या प्रकारामुळे दुर्गम भागात वीज ग्राहकांच्या संख्येत घट होत आहे.

गडचिरोली जिल्ह्यात दुर्गम गावामध्ये राजरोसपणे वीजचोरीचा प्रकार नित्याची बाब झाली आहे. मात्र, वीज कर्मचाऱ्यांची संख्या कमी असल्याने कारवाईसाठी अडचणी जात आहेत. वीज कर्मचाऱ्यांवर हल्ले झाल्याचेही अनेकदा घडले आहेत. त्यामुळे वीज चोरट्यांची हिंमत वाढली आहे. सिरोंचा, अहेरी, भामरागड, कोरची, मुलचेरा, एटापल्ली, धानोरा या तालुक्‍यातील अनेक दुर्गम गावात वीजचोरीचे प्रकार होत असल्याने वीज वितरण कंपनीला महिन्यापोटी लाखो रुपयांचे आर्थिक नुकसान होत आहे.

वीजचोरी रोखण्यासाठी वीज वितरण कंपनीने शहरात विशेष पथक तयार केले आहे. यामुळे शहरी भागात वीजचोरीला आळा बसला असून वीज चोरट्यांकडून मोठ्या प्रमाणात भुर्दंडसुद्धा वसूल करण्यात येत आहे.

रिक्त पदांची समस्या कायम
जिल्ह्यात ग्रामीण भागात वीज कर्मचाऱ्यांची मोठ्या प्रमाणात रिक्त पदे असल्याने त्याचा कार्यरत कर्मचाऱ्यावर कामाचा अधिकचा ताण पडत आहे. कर्मचाऱ्यांची पदे भरण्याची मागणी सातत्याने केली जात आहे. परंतु त्याची पूर्तता होत नसल्याने ग्रामीण भागात वीजग्राहकांच्या समस्या सोडवण्यात अडचण निर्माण होत आहे.

वादळी वारा, पाऊस यामुळे अनेकदा वीज तारा तुटणे, झाड पडण्याचे प्रकार होत असतात. यामुळे अनेकदा आठ-आठ दिवस वीजपुरवठा खंडित होत असतो. या समस्येकडे वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांनी लक्ष द्यावे अशी मागणी केली जात आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Gadchiroli: "In those 'villages there was still electricity theft