नक्षल्यांकडून दोघांची हत्या 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 2 डिसेंबर 2019

नक्षल सप्ताहाच्या पहिल्याच दिवसी दोन व्यक्तींची हत्या झाल्याने एटापल्ली तालुक्‍यात दहशत पसरली आहे. या घटनेचा पुढील तपास हेडरी पोलिसांकडून केला जात असून, नक्षल विरोधी शोध मोहीम तीव्र करण्यात आली आहे.

एटापल्ली (जि. गडचिरोली) : एटापल्ली तालुक्‍यात नक्षल्यांनी दोन नागरिकांची गोळ्या घालून हत्या केल्याची घटना रविवारी (ता. 1)  उघडकीस आली. मासू पुंगाटी (वय 55) व ऋषी मेश्राम (वय 45) अशी हत्या केलेल्या नागरिकांची नावे आहेत. एटापल्ली तालुक्‍यातील हेडरी येथील उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालयाच्या शेजारी ही घटना घडली. 

सुरजागड लोहखनीज उत्खनन कामाला मासू पुंगाटी व ऋषी मेश्राम मदत करत असल्याने त्यांची हत्या केल्याचे बोलेले जात आहे. रविवारी (ता. 1) रात्री 30 ते 40च्या संख्येतील शस्त्रधारी नक्षल पुरसलगोंदी गावात आले. त्यांनी मासू पुंगाटी व ऋषी मेश्राम यांना झोपेतून उठवून जंगलाच्या दिशेने नेले. यावेळी नातेवाईकांनी विरोध केला. मात्र, बंदुकीचा धाक दाखवून त्यांना दमदाटी करण्यात आली.

ही बातमी अवश्य वाचा - नक्षल्यांच्या प्रशिक्षण तळावर "सर्जिकल स्ट्राईक', दोन नक्षली ठार 

सोमवारी सकाळी दोघांचेही मृतदेह नागरिकांना आढळून आले. नक्षल्यांकडून दोन ते आठ डिसेंबरपर्यंत पीएलजीए सप्ताह पाळून दहशत निर्माण केली जाते. 19 वर्षांपूर्वी पीपल्स लिबरेशन गुरीला आर्मी या हिंसक संघटनेची स्थापना करण्यात आली होती. नक्षल संघटनेच्या हिंसक कारवायात आजवर अनेक राजकीय पुढारी, पोलिस अधिकारी, कर्मचारी व सामान्य नागरिकांचे बळी घेतले गेले आहेत.

नक्षल सप्ताहाच्या पहिल्याच दिवसी दोन व्यक्तींची हत्या झाल्याने एटापल्ली तालुक्‍यात दहशत पसरली आहे. या घटनेचा पुढील तपास हेडरी पोलिसांकडून केला जात असून, नक्षल विरोधी शोध मोहीम तीव्र करण्यात आली आहे. लक्षल्यांनी सोमवारी सकाळी भामरागड-आलापल्ली मार्गावर झाड तोडून रस्ता अडविला. यामुळे वाहतुकीवर परिणाम झला. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: gadchiroli : Two people killed by Naxals