Vidhansabha 2019 : गडचिरोलीत विद्यमानांसोबतच माजी आमदारांचीही कसोटी

Gadchiroli-Vidhansabha
Gadchiroli-Vidhansabha

नक्षलवाद्यांच्या विरोधाला, दहशतीला न जुमानता भरघोस मतदान झाल्याने मतदारांबरोबरच उमेदवारांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. आपण घेतलेल्या श्रमाला किती यश येते, यावर विधानसभेच्या उमेदवारीची गणिते असल्याने इच्छुकांचे तिकडे डोळे लागलेत. तरीही, उमेदवारीसाठी त्यांची मोर्चेबांधणी सुरू आहे.

नक्षलवाद्यांच्या धमकीनंतरदेखील गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदारसंघात यंदाही मतदारांचा मतदानाला भरघोस प्रतिसाद मिळाला. आपल्या मर्जीतील उमेदवार न दिल्याने भाजप आणि काँग्रेस पक्षामधील प्रमुख नेत्यांची कुरकूर सुरू होती; ती मतदानाच्या दिवसापर्यंत बघायला मिळाली. त्यामुळे निवडणूक निकालानंतर विद्यमान आमदारांच्या परिश्रमाचे मूल्यमापन होऊन त्यांच्या उमेदवारीचा कसोटीचा काळ सुरू होणार आहे. मात्र, लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्ताने इच्छुकांनी मतदारांशी जवळीक साधण्याची संधी मिळविली.

अहेरी विधानसभा मतदारसंघात आगामी निवडणुकीत पुन्हा राजा, बाबा आणि दादा एकमेकांसमोर येणार आहेत. त्यादृष्टीने माजी मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांनी जोरदार तयारी चालविली आहे; तर माजी आमदार दीपक आत्राम यांना भाजपच्या तिकिटाचा वेध लागल्याची चर्चा आहे. पालकमंत्री राजे अम्ब्रीशराव आत्राम यांच्याबद्दल नाराजीचा सूर आहे. त्यामुळे त्याचा फायदा ते घेऊ इच्छितात.

गडचिरोली विधानसभा मतदारसंघात काँग्रेसकडून विश्‍वजित कोवासे गुडघ्याला बांशिंग बांधून तयार आहेत, तर लोकसभेचे तिकीट नाकारलेले डॉ. नितीन कोडवते हेही तयारीत आहेत. भाजपकडून आमदार डॉ. देवराव होळी तसेच प्रकाश गेडाम हे दोन नेते स्पर्धेत आहेत. आरमोरी विधानसभा मतदारसंघात काँग्रेसकडून नव्या चेहऱ्याला संधी मिळण्याची शक्‍यता आहे. माजी आमदार आनंदराव गेडाम प्रयत्नात आहेत. मात्र, काँग्रेसच्या एका गटाकडून त्यांना विरोध आहे. भाजपकडून क्रिष्णा गजबे वा शिवसेनेचे डॉ. रामकृष्ण मडावी यांनाही संधी मिळण्याची शक्‍यता आहे.

वडेट्टीवार यांचे तिकीट पक्के?
ब्रह्मपुरी विधानसभा मतदारसंघात आमदार विजय वडेट्टीवार यांचे तिकीट पक्के मानले जाते. तर, भाजप अतुल देशकरांचेच कार्ड चालवतो की नवीन चेहरा म्हणून संदीप गड्डमवार, याबाबत चर्चा सुरू आहे.

चिमूरमध्ये पुन्हा एकदा भंडी भांगडीयांना संधी मिळेल, असे वाटते. तथापि, तेथेही तिकिटासाठी इच्छुकांमध्ये चुरस राहणार आहे. गोंदिया जिल्ह्यातील आमगाव मतदारसंघात विद्यमान आमदार संजय पुराम आहेत. पण, येथे भाजप आणि काँग्रेसकडून नव्या चेहऱ्याला संधी मिळेल, अशी चर्चा आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com