गडकरींची छायाचित्रे नसल्याने समर्थक नाराज 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 25 जून 2018

नागपूर - भाजपने नागपूरच्या विकासकामांची केलेल्या पुस्तिकेत केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांचे छायाचित्र नसल्याने गडकरी समर्थक अनेक नगरसेवक व पदाधिकारी नाराज झाले आहेत. भाजपचे प्रदेश संघटनमंत्री विजय पुराणिक यांच्यासमोर ही नाराजी व्यक्त केल्याने नेतेही काही समाधानकार उत्तर देऊ शकले नाही, असे वृत्त आहे. 

भाजप प्रदेश संघटन मंत्रिपद सांभाळल्यानंतर पुराणिक पहिल्यांदाच नागपुरात आले. त्यांनी आमदार व भाजपच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. या वेळी पदाधिकाऱ्यांना शहरात केलेल्या विकासकामांची पुस्तिका देण्यात आली. या पुस्तिकेत पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांचे छायाचित्रे छापले आहेत. या पुस्तिकेत नितीन गडकरी यांचे छायाचित्र नाही. 

गडकरी यांचे छायाचित्र नसल्याचे पाहून गडकरी समर्थक नगरसेवक व काही पदाधिकारी नाराज झाले. काही नगरसेवकांनी या संदर्भात पुराणिक यांनाच सवाल केला. गडकरी यांचे शहराच्या विकासात महत्त्वाचे योगदान असताना त्यांचे पुस्तिकेत छायाचित्र का नाही, असा सवाल केला. अनेकांनी अशा भावना पुराणिक यांच्यासमोर व्यक्त केल्या. या संदर्भात पुराणिक व इतर नेत्यांनी नगरसेवक व पदाधिकाऱ्यांना समजाविण्याचा प्रयत्न केला. 

मुख्यमंत्रिपदी देवेंद्र फडणवीस यांची नियुक्ती होण्यापूर्वीपासून हा संघर्ष सुरू झाला होता, असे बोलले जातो; परंतु सार्वजनिक ठिकाणी फडणवीस व गडकरी यांनी मतभेद असल्याचे दिसू दिले नाही. अनेक सार्वजनिक कार्यक्रमात दोन्ही नेत्यांनी एकमेकांची स्तुती केली. या पुस्तिकेत छायाचित्र नसल्याने मात्र गडकरी समर्थक नगरसेवक व पदाधिकारी चांगलेच नाराज झाले आहेत. 

Web Title: Gadkari supporters upset