esakal | शाळकरी मुले खेळातल्या हारजितीवर लावताहेत पैसे?
sakal

बोलून बातमी शोधा

kumbhali

सारा वेळ दिवसभर मौजमस्ती, उनाडक्‍या करण्यात घालवित आहेत. या रिकामपणाच्या वेळात पत्ते, कंचे, बिल्ले या केवळ मनोरंजनाच्या खेळावर ही शाळकरी मुले पैसे लावताना दिसतात. यातून त्यांना पैशाची चटक लागली आहे.

शाळकरी मुले खेळातल्या हारजितीवर लावताहेत पैसे?

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

कुंभली (जि. भंडारा) : लहानपणी खेळले जाणारे खेळ हे निखळ मनोरंजन असते. त्यात हार, जीत असली तरी ती नाममात्र असते. कुठेही आकस नसतो. परंतु, अलीकडे या पारंपरिक खेळांमधील सोज्वळपण, निर्व्याजपण हरवत चालले आहे. मोठ्यांचे अनुकरण करीत लहान मुलेसुद्धा एकमेकांवर कुरघोडी करून पैशांसाठी खेळ खेळत असल्याचे दिसते.

ग्रामीण भागात लगोरी, कंचे, चौरस, विटी-दांडू तर पावसाळ्यात सळाख, रिंगण असे खेळ लोकप्रिय आहेत. 23 मार्चपासून कोरोनामुळे लॉकडाउन सुरू झाले. तेव्हापासून शाळेला सुट्या लागल्या. आजही बहुतेक शाळा बंदच आहेत. त्यामुळे लहान मुलांचा घरात वेळ जात नाही. अनेक मुले अभ्यासाकडे दुर्लक्ष करीत आहेत. नवी पुस्तके मिळाली, पण त्याकडे कोणी ढुंकूनही पाहत नाहीत. सारा वेळ दिवसभर मौजमस्ती, उनाडक्‍या करण्यात घालवित आहेत. या रिकामपणाच्या वेळात पत्ते, कंचे, बिल्ले या केवळ मनोरंजनाच्या खेळावर ही शाळकरी मुले पैसे लावताना दिसतात. यातून त्यांना पैशाची चटक लागली आहे.
शेतीची कामे सुरू झाल्याने आईवडील शेतकामात असतात. मुलांकडे लक्ष द्यायला त्यांना वेळ नाही. शाळा सुरू असती तर दिवसभर शाळेत कसेतरी अडकून असतात. परंतु, आता मात्र त्यांना लगाम कसा घालावा याचा विचार पालकांसमोर आहे.

ऑनलाइनचे सोंग
गेल्या महिनाभरापासून ऑनलाइन शिक्षण प्रणाली सुरू आहे. काही दिवसांपूर्वी मुलांना पुस्तके वाटप झाली. परंतु, शाळा अद्याप सुरू झालेल्या नाहीत. गावांत प्रत्येक पालकांकडे स्मार्ट फोन नाही. ज्यांच्याकडे आहे त्यांची मुले कशीतरी जबरदस्तीने अभ्यास करतात. पण मुलांना अभ्यास नव्हे तर गेममध्ये जास्त इंटरेस्ट असतो. त्यामुळे ऑनलाइन शिक्षणाचा त्यांना फारसा उपयोग होताना दिसत नाही. दिवसभर टीव्ही नाही तर मग असे खेळ असा प्रकार सुरू आहे. याकडे पालक, शिक्षकांनी विशेष लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे.

सविस्तर वाचा - आयुक्‍त मुंढेंना आता कोणी दिला इशारा?

पालकांसमोर समस्या
कंचे, पत्ते, बिल्ले या खेळांवर लहान मुले पैसे लावताना दिसतात. शाळा बंद असल्याने लहान मुले दिवसभर या खेळाकडे जास्त आकर्षित होत आहेत. घरी पैशासाठी हट्ट धरीत आहेत. खाऊसाठी मिळालेले पैसे ते या खेळात खर्च करतात. पैसे हातात आल्यामुळे त्यांना खर्रा, धुम्रपान यासारखे वाईट व्यसन लागण्याची शक्‍यता नाकारता येत नाही. शाळा सुरू झाली की, अभ्यासाची गोडी लागेल आणि लहान मुले पुन्हा अभ्यासाला लागतील असे पालक सांगतात परंतु कोरोनाच्या वाढत्या संख्येमुळे शाळा कधी सुरू होईल हे सांगणे सध्या तरी कठीण आहे.