भडकले गॅंगवॉर

Gangwar
Gangwar

नागपूर - शहरात पुन्हा एकदा गॅंगवार भडकले असून, अजनीत एका कुख्यात टोळीचा प्रमुख शुभम गोद्रे याच्यावर प्रतिस्पर्धी टोळीतील १० ते १२ जणांनी शस्त्रांनी हल्ला केला. काही नागरिकांनी हस्तक्षेप केल्याने त्याचा गेम फसला. गंभीर अवस्थेतील शुभमवर मेडिकलमध्ये उपचार सुरू आहेत.

याप्रकरणी अजनी पोलिसांनी सूरज बिहारी याच्यासह १२ जणांवर गुन्हे दाखल केले. तीनच दिवसांपूर्वी शहरात चोवीस तासात तीन खून झाले होते. यात दोन खून गॅंगवॉरमधून झाले आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या दोन दिवसांपूर्वी शुभम गोद्रे (वय २३, चिंचभवन) याचा आणि कुख्यात गुंड सूरज बिहारी याच्या मित्रांमध्ये वाद झाला. शुभमने सूरजच्या मित्राला शिवीगाळ करून मारहाण केली होती. तो सूरजकडे गेला आणि प्रतिस्पर्धी टोळीने धमकी दिल्याचे सांगितले.

त्यामुळे सूरजने शुभमच्या टोळीचे वाढते प्रस्थ पाहता त्याचा ‘गेम’ करण्याचा कट रचला. शनिवारी मध्यरात्री अजनीतील राजकमल चौकात शुभम व त्याचा मित्र प्रवीण कळस्कर याच्यासोबत उभा होता. 

दरम्यान, सूरज टोळीतील १२ सदस्यांना घेऊन शस्त्रासह पोहोचला. शुभमला सूरजच्या टोळीने घेरले आणि तलवारीने हल्ला केला. संधी साधून प्रवीण घटनास्थळावरून पळून गेला. रस्त्यावरील काही नागरिकांनी शुभमच्या मदतीसाठी धाव घेतली. एकाने पोलिस कंट्रोल रूमला फोन केला. 

पोलिस घटनास्थळावर पोहोचल्यानंतर गुंड पळून गेले. गंभीर जखमी शुभमला मेडिकलमध्ये दाखल करण्यात आले. त्याची प्रकृती नाजूक आहे. याप्रकरणी अजनी पोलिसांनी सूरज आणि टोळीवर खून करण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला.

सेटिंगबाजांचे अर्थपूर्ण संबंध?
नागपूरचे तत्कालीन पोलिस आयुक्‍त शारदाप्रसाद यादव यांनी पहिल्यांदा शहरातील गॅंगवारला गांभीर्याने घेत टोळ्यांवर धडक कारवाईची मोहीम उघडली होती. मात्र, त्यानंतर काही  ‘सेटिंगबाज’ पोलिस कर्मचाऱ्यांनी पुन्हा टोळ्यांशी ‘अर्थपूर्ण’ संबंध जोपासत स्वतःचा फायदा करून घेतला. मात्र, आता या टोळ्या दिवसेंदिवस वाढत आहेत. शहरातील गॅंगवॉरमुळे कायदा व सुव्यवस्थेचे तीनतेरा वाजले आहेत.

पोलिसांचा वचक संपला?
शहरात गुंडांनी डोके वर काढले आहे. गॅंगवॉरमधून हत्याकांडाचे प्रकारही वाढले आहे. गुन्हेशाखेतील काही कर्मचारी आणि पोलिस ठाण्यातील कर्मचाऱ्यांनी गुंडांकडून चिरीमिरीचे  संबंध जोपासणे सुरू केले आहे. त्यामुळे पोलिसांचा वचक संपला असून, नागरिक काही  अन्याय झाल्यास पोलिस ठाण्याऐवजी वस्तीतील गुंडांकडे न्याय मागण्यासाठी जात असल्याची चर्चा आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com