‘गॅंगवॉर’, गोळीबाराने गाजले वर्ष

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 30 डिसेंबर 2016

नागपूर - शहरात गुंडांच्या वेगवेगळ्या टोळ्यांमध्ये वर्चस्वातून झालेले ‘गॅंगवॉर’, त्यातून दिवसाढवळ्या चाललेल्या गोळ्या, यातून घडलेल्या हत्याकांडामुळे २०१६ वर्ष गाजले. वर्षाच्या शेवटी डिसेंबरमध्ये खुनाच्या घटना लागोपाठ १० घडल्याने शहर हादरले. वाढत्या गुन्हेगारीमुळे शहरात कायदा व व्यवस्था आहे की नाही, याबाबत संशय व्यक्‍त केला जात आहे. 

नागपूर - शहरात गुंडांच्या वेगवेगळ्या टोळ्यांमध्ये वर्चस्वातून झालेले ‘गॅंगवॉर’, त्यातून दिवसाढवळ्या चाललेल्या गोळ्या, यातून घडलेल्या हत्याकांडामुळे २०१६ वर्ष गाजले. वर्षाच्या शेवटी डिसेंबरमध्ये खुनाच्या घटना लागोपाठ १० घडल्याने शहर हादरले. वाढत्या गुन्हेगारीमुळे शहरात कायदा व व्यवस्था आहे की नाही, याबाबत संशय व्यक्‍त केला जात आहे. 

पहिल्याच दिवशी खून
जानेवारी महिन्याच्या पहिल्याच दिवशी संपूर्ण शहर नववर्ष साजरे करीत असताना खट्या कांबळे या युवकाचा विनोद रामटेके या गुंडाने खून केला. या घटनेला १५ दिवस होत नाही तोच १६ जानेवारीला सक्‍करदऱ्यातील बजाज ग्राउंडवर तरुणांनी शेखर वडस्कर (बिडीपेठ) याचा गळा चिरला. गावगुंड संतोष आंबेकरने २६ जानेवारी रोजी कसलीही पोलिस परवानगी न घेता रॅली काढली. या रॅलीत गुन्हेगारी विश्वातील अनेक गुंड सहभागी झाले होते. पोलिसांनी या मिरवणुकीची दखल घेत संतोष व त्याच्या सहकाऱ्यांवर गुन्हे दाखल केले. 

सर्वाधिक खून अनैतिक संबंधातून
बेलेझा सलूनचा संचालक क्‍लिंट हेल (वय २७, अनंतनगर) याचा वस्तीतील युवतीशी असलेल्या प्रेमसंबंधातून युवकांनी खून केला. मंगला खडसे (वय ३०, भांडेवाडी) या महिलेच्या अनैतिक संबंधामुळे पती रमेशने तिचा गळा आवळून खून केला होता. प्रतापनगरातील कुख्यात गुंड कुलदीप ऊर्फ पंडित चंद्रकांत तिवारी या युवकाचा वस्तीतील युवतीचे लैंगिक शोषण केल्यामुळे आठ युवकांनी प्रतापनगरात चाकूने भोसकून खून केला होता. जरीपटक्‍यातील प्रशांत चमकेने दोन भावंडांचा घरात घुसून खून केला. त्याचे खून केलेल्या युवकाच्या पत्नीशी अनैतिक संबंध होते. अनैतिक संबंधातून अफसाना परवीन अशरफखाँ पठाण (वय ३५, रा. भिवापूर) या पोलिस कर्मचारी असलेल्या महिलेचा प्रियकर दिनेश देवराव चिंचवलकर (वय २७, भिवापूर) याने कॉटन मार्केटमधील एका लॉजमध्ये खून केला होता. लवप्रीत कौर या महिलेचा पती गुरुदेवसिंग कर्नलसिंग मोहर (वय ४०) याने खून केला. हे हत्याकांड डिसेंबरमध्ये उघडकीस आले.

दोन भावंडांचा खून 
जरीपटक्‍यातील समतानगरात नालेसफाईच्या कारणावरून कुख्यात गुंड प्रशांत चमकेने इमरत राणा (वय २१) आणि पुरणलाल राणा (वय २३, समतानगर) या दोन भावंडांचा घरात घुसून चाकू, तलवारीने वार करून खून केला. याच प्रशांत चमकेच्या घरासमोर जवळपास एक पोतेभरून शस्त्रसाठा जरीपटका पोलिसांना सापडला होता. जरीपटका पोलिसांचा आशीर्वाद असल्याने प्रशांतची परिसरात दहशत होती.

नितिका फार्माने जाळले १० संसार
यशोधरानगरातील पिवळी नदी येथील निकिता फार्मा या औषधी कंपनीला आग लागून या आगीत नयन टगणे, युवराज पाटील, अमोल कावळे, संदीप पनकुले, संकेत कांबळे, ज्ञानेश्वर राऊत, योगेश अलोणे, विकास पथे, विशाल सोनटक्के आणि पांडुरंग कांद्रीकर या कामगारांचा होरपळून मृत्यू झाला. या कंपनीच्या आगीच्या शेकोटीवर राजकारण्यांनीसुद्धा हात शेकले. तसेच राजकीय पोळीसुद्धा शेकली होती.

गोळीबाराने उडवली पोलिसांची झोप 
मॉर्निंग वॉक करून घरी निघालेले आर्किटेक्‍ट एकनाथ निमगडे यांच्यावर लाल इमली चौकात दुचाकीस्वारांनी गोळीबार केला. शेतजमिनीच्या वादातून ही घटना घडली होती. चार महिने होऊनही या खुनाचा तपास न लागल्याने न्यायालयाच्या आदेशान्वये हे प्रकरण सीबीआयकडे सोपविण्यात आले. या घटनेनंतर अजनी हद्दीत एका चिकन विक्रेत्यावर जमिनीच्या वादातून गोळीबार करण्यात आला. सुदैवाने यात चिकनविक्रेता बचावला. अंबाझरी हद्दीत गोकुळपेठ मार्केट येथे भरदिवसा सचिन सोमकुंवर या गुंडावर रिव्हॉल्व्हरमधून  गोळ्या झाडून खून करण्यात आला. या घटनेची शाई वाळते न वाळते तोच धरमपेठ येथील लाहोरी बारमध्ये तरुणीची छेड काढल्यावरून हॉटेल प्रशासन आणि ग्राहकांमध्ये वाद झाला. या वादावादीत दोन्ही गटांतील लोकांनी एकमेकांवर गोळीबार केला. सुदैवाने यात कुणाचाही बळी गेला नाही. जरीपटका भीमचौकातील मण्णपूरम गोल्ड लोण येथे देशीकट्ट्याच्या धाकावर दरोडेखोरांनी लाखांचा ऐवज लंपास केला. भरदिवसा आणि गर्दीच्या ठिकाणी ही घटना घडली असल्याने एकच खळबळ उडाली होती. पोलिसांनी एका दरोडेखोराच्या पत्नीला अटक केली. परंतु, तिनेही फारशी माहिती दिली नाही. सध्या ती मध्यवर्ती कारागृहात आहे. 
 

गुंडांच्या टोळ्यांवर मोक्का कारवाई  
तत्कालीन पोलिस आयुक्त शारदाप्रसाद यादव यांच्या कार्यकाळात मोठ्या प्रमाणात गुंडांच्या टोळ्यांवर मोक्काची कारवाई करण्यात आली. त्यात प्रामुख्याने राजू भद्रे, संतोष आंबेकर, गोल्डी ऊर्फ भुल्लर सिंग आणि मुकेश तायवाडे या टोळ्यांचा समावेश होता. पिंटू शिर्के खून प्रकरणात शिक्षा सुनावण्यात आलेल्या राजू भद्रे संचित रजेवर कारागृहात बाहेर आल्यानंतर त्याने व त्याच्या साथीदाराने बिल्डर अजय श्‍यामराव राऊत यांचे अपहरण करून त्यांना २ कोटींची मागणी केली होती. त्यापैकी दीड कोटी रुपये राऊत यांनी दिल्यानंतर त्यांची सुटका करण्यात आली. या प्रकरणी पोलिसांनी भारत ऊर्फ राहुल सुशील दुबे (भोसलेवाडी, मोतीबाग), कार्तिक शिवराम तेवार (ख्रिश्‍चन कॉलनी, जरीपटका), आशीष वीरेंद्र नायडू (बेलीशॉप वसाहत), नितीन सुनील वाघमारे (भिलगाव), दिवाकर बबन कोत्तुलवार आणि आशीष बबन कोत्तुलवार (मनीषनगर), खुशाल ऊर्फ जल्लाद ऊर्फ पहलवान थूल (गड्डीगोदाम) यांना अटक केली होती. याच प्रकरणात क्रिकेट बुकी सुनील भाटिया यालाही अटक करून त्यांच्यावर मोक्काची कारवाई करण्यात आली. सहकारनगर येथील स्वप्नील बिडवई यांचे घर हडप करण्याच्या प्रयत्नात सोनेगाव पोलिसांनी संतोष आंबेकर, युवराज माथनकर, गौतम भटकर यांच्यासह जणांना अटक करून त्यांच्यावर मोक्का लावला होता. 

आमदारपुत्रांची गुंडगिरी 
शंकरनगर चौकातील क्‍लाउड सेव्हन बारमध्ये बिलाच्या वादावरून झालेल्या भांडणात आमदार कृष्णा खोपडे यांची मुले अभिलाष आणि रोहित यांनी साथीदारांच्या मदतीने सनी बोम्ब्रतवार याचा खून करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर झालेल्या भांडणात बारमालक व त्याच्या साथीदारांनी अभिलाष खोपडे याचा मित्र शुभम महाकाळकर याचा खून केला होता. आमदाराशी संबंधित हे प्रकरण असल्याने गाजले होते. 

‘डेंजर’ डिसेंबर 
हत्याकांडाचे सत्र सुरू असताना वर्षाचा शेवटचा महिना ‘डेंजर’ ठरला. या महिन्यात लागोपाठ १० खुनांच्या घटना घडल्या. कोतवाली हद्दीत राहणाऱ्या एका मातेने ८ वर्षीय मुलाचा गळा दाबून खून केला आणि स्वत: तिने गांधीसागरात आत्महत्या केली होती. चार दिवसांनंतर प्रकरण उघडकीस आले होते. त्यातच ५ डिसेंबरपासून हिवाळी अधिवेशनाला सुरुवात झाली. हिवाळी अधिवेशन संपण्यापूर्वीच हत्याकांडाचे सत्र सुरू झाले. १७ डिसेंबर रोजी जरीपटका, अंबाझरी, नंदनवन आणि हुडकेश्वर येथे चार खून झाले. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी म्हणजे १८ डिसेंबरला पाचपावली आणि हुडकेश्वर येथे दोन खून झाले. त्यानंतर लकडगंज, बजाजनगर आणि हुडकेश्‍वरातही खुनाच्या प्रत्येकी एक घटना घडल्या.

Web Title: gangwar, firing year