गिट्टीखदान परिसरात गॅंगवॉर 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 20 मे 2019

गिट्टीखदानमध्ये गॅंगवॉरमधून एका युवकाचे अपहरण करून त्याला ठार मारण्याचा प्रयत्न करण्यात आला. गंभीर जखमी अवस्थेत जखमी युवकाला वाडीतील वेलट्रिट रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ही घटना सुयोगनगर परिसरातील एनआयटीच्या खुल्या मैदानात शनिवारी मध्यरात्रीच्या सुमारास घडली.

नागपूर - गिट्टीखदानमध्ये गॅंगवॉरमधून एका युवकाचे अपहरण करून त्याला ठार मारण्याचा प्रयत्न करण्यात आला. गंभीर जखमी अवस्थेत जखमी युवकाला वाडीतील वेलट्रिट रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ही घटना सुयोगनगर परिसरातील एनआयटीच्या खुल्या मैदानात शनिवारी मध्यरात्रीच्या सुमारास घडली. योगेश सुरेश सिरसवार (37) असे जखमीचे नाव आहे. पोलिसांनी बोक्‍या ऊर्फ आकाश पवारला अटक केली आहे. 

पोलिसांच्या माहितीनुसार, दोन्ही टोळीतील सर्वच सदस्यांवर गंभीर स्वरूपाचे गुन्हे आहेत. शनिवारी योगेश सुरेश सिरसवार यांच्यासोबत या टोळीतील विक्की चव्हाण, रवी थांडे, सनी मेश्राम, विक्की टुले, इशांत राऊत, मनोज भांदे हे सुयोगनगरातील खुल्या मैदानात खुलेआम दारू पित होते. त्यातील विक्की चव्हाणचे दुसऱ्या टोळीतील काही सदस्यांसोबत एका जुन्या प्रकरणावरून वाद आहे. दुसऱ्या टोळीला विक्की टुले तेथे असल्याचे कळले. त्यानंतर या टोळीचे चारुदत्त नरभरीया, सोम वर्मा, आकाश पवार, कल्याण मिश्रासह एकूण 10 ते 12 जण तेथे पोचले. त्यातील काहींनी अचानक पहिल्या टोळीतील सदस्यांवर धारदार शस्त्राने हल्ला चढवला. वेळीच हा प्रकार निदर्शनात आल्याने काहींनी पळ काढत आरडा-ओरड केली. परंतु, योगेश तेथे अडकल्याने आरोपींनी त्यावर सपासप वार केले. दरम्यान, येथे परिसरातील नागरिक घटनास्थळाकडे येत असल्याचे बघत आरोपी पसार झाले. उपस्थितांनी तातडीने जखमीला वेलट्रिट रुग्णालयात दाखल केले. सध्या जखमीची प्रकृती अत्यवस्थ असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Gangwar in Gidhikhadan aera

टॅग्स