गोंडेगावात ड्रोनद्वारे गावठाण मोजणी 

टेकाडी ः ड्रोनद्वारे सर्वेक्षण करताना अधिकारी.
टेकाडी ः ड्रोनद्वारे सर्वेक्षण करताना अधिकारी.

टेकाडी  (जि.नागपूर): राज्य शासनाच्या वतीने ग्रामविकास विभाग, भूमिअभिलेख विभाग व सर्वे ऑफ इंडियाच्या संयुक्‍त सहकार्याने संपूर्ण महाराष्ट्रात चाळीस हजार गावांसाठी ड्रोनद्वारे गावठाण सर्वेक्षण करण्याचा कार्यक्रम शासनाने हाती घेतला आहे. महाराष्ट्रात पुणे व औरंगाबादच्या काही भागातील गावठाण सर्वेक्षण झाले असून विदर्भात नागपूर जिल्ह्याअंतर्गत सोळाशे गावांचा समावेश यात आहे. गुरुवारी पारशिवणी तालुक्‍यातील गोंडेगाव, घाटरोहना, गाडेघाट या गावांची गावठाण मोजणी ड्रोनच्या साहाय्याने भूमिअभिलेख अधिकारी व गावातील नागरिकांच्या उपस्थितीत करण्यात आले. 
या अवघ्या नऊ मिनिटांच्या उड्‌डाणात संपूर्ण गोंडेगावची ड्रोनद्वारे मोजणी करण्यात आली. या आधुनिक पद्धतीने वेळ वाचला जात असून कामात अचूकतादेखील दिसून आली. जिल्ह्यासाठी तीन कॅमेरे नेमण्यात आले आहेत. ड्रोनच्या आधारे "थ्रीडी' पद्धतीने टिपल्या गेलेल्या छायाचित्रामुळे विविध विकास यंत्रणा व विभागांना नियोजन करताना सुलभता येत असल्याची माहिती यादरम्यान देण्यात आली. शासनाच्या या उपक्रमामुळे आता गावठाणमधील मिळकतींची मोजणी ड्रोनद्वारे होईल. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात भूमिअभिलेख कार्यालयाकडून गावठाणांच्या हद्दी निश्‍चित करण्याचे काम सुरू करण्यात आले होते. हे काम पूर्ण झाल्यानंतर जिल्ह्यातील गावांमध्ये ड्रोनद्वारे मोजणीला सुरुवात झाली. यामुळे वेळेची बचत होत असून शिवाय हद्दीमुळे होणारी वादाची प्रकरणेही कमी होण्यास मदत होईल. गावाची वाढती लोकसंख्या, विकासाच्या योजना यामुळे गावात भौगोलिक बदल होत असून जमीन हस्तांतरणाची प्रक्रिया वेगाने सुरू आहे. परंतु, ग्रामीण भागात गावठाणाचे अभिलेख नसल्याने नेमकी जागा किती आहे, याबाबत सुस्पष्टता नसते. गावामधील बांधकाम परवाने देण्याचे अधिकार योग्य पद्धतीने हाताळण्याकरिता जागेचा नकाशा व गावठाणाचे भूमापन असणे गरजेचे आहे. मालमत्तेचे मालकीपत्र नसल्याने आर्थिक पतही निर्माण होत नाही. त्यामुळे ग्रामस्थांची गैरसोय टाळण्यासाठी मिळकतींची मोजणी करण्याचे काम शासनाने सुरू केले आहे. ही प्रक्रिया जलद होण्यासाठी ड्रोनद्वारे मोजणी केली जात आहे. प्रकल्प म्हणून आज पारशिवनी तालुक्‍यातील गोंडेगाव येथे हा उपक्रम राबविण्यात आला. राज्यभरातील 40 हजार गावांमध्ये ही योजना राबवली जात असून नागपूर जिल्ह्यात सोळाशे गावांचा समावेश आहे. यावेळी केंद्र शासन सर्वेअर ऑफिसर विजय बेहरा, सर्वेक्षक रामनरेश यादव, भूकरमापक विजय डाहाके, गावठाण अधिकारी डी. जी. फरकाडे, पारशिवनी पर्यवेक्षण भूमापक जी. जी. निर्वाण, अशोक जाधव व विनोद सयाम, सूर्यभान फरकाडेंसोबत ग्रामपंचायत कर्मचारी संजय मेश्राम, चंदू चिंचखेडे यांची उपस्थिती होती. 
राज्यातील चाळीस हजार गावठाण ग्रामीण क्षेत्राचे "लार्ज स्केल मॅप' बनविण्यात येणार आहे. याआधी औरंगाबाद येथे "प्रोजेक्‍ट'ला सुरुवात झाली आहे. नागपूर जिल्हा हा दुसरा प्रोजेक्‍ट सुरू करण्याचा जिल्हा आहे, जिल्ह्यातील 38 गाव आतापर्यंत मोजून झालेली आहे, गावठाणाच्या मिळकतीच्या मागे आखीव पत्रिका तयार व्हावी आणि घरमालकाला मालकी हक्काचा पुरावा मिळावा हा उद्देश शासनाचा आहे. 
विजय डहाके 
भूकरमापक अधिकारी, सर्वेक्षक 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com