
Gas Cylinder Subsidy : घरगुती गॅस सिलिंडरची सबसिडी पुन्हा सुरू करा; गृहिणींची सरकारकडे मागणी
केत्तूर : केंद्र सरकार व राज्य सरकारने घरगुती गॅस सिलिंडरची बंद केलेली सबसिडी पुन्हा एकदा सुरू करावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते ॲड. अजित विघ्ने यांनी केली आहे. गेले तीन वर्षापासून मिळणारी गॅस सबसिडी सरकारकडून सध्या बंद करण्यात आलेली आहे.
त्यातच रोजच वाढणाऱ्या जीवनावश्यक वस्तूंची महागाईमुळे सर्वसामान्य जनता त्रस्त झाली आहे. तर विजेचे वाढणारे बिल यामुळे तर सर्वसामान्य जनता वैतागून गेली आहे. ‘आता जगावं तरी कसं’ हाच प्रश्न त्यांना सतावत आहे.
यामुळे गेली काही वर्षांपासून बंद असलेली चूल पुन्हा एकदा चालू करण्याची वेळ येथील सर्व सामान्यांवर आली आहे. गॅस सिलिंडर दर कमी केल्यास आर्थिक हातभार लागणार आहे. परंतु गॅसच्या दरात वारंवार वाढत होत आहे. त्यामुळे महिला वर्गाला कसरत करावी लागत आहे.
कोरोना काळापासून सर्वसामान्य माणसांची आर्थिक परिस्थिती खालावलेली आहे. त्यामुळे घरगुती गॅसचे दर कमी करून त्यांना दिलासा द्यावा व गॅस सबसिडी पूर्ववत सुरू करण्यात यावी, अशी त्यांनी मागणी विघ्ने यांनी केली आहे.
सध्या रोजच वाढणाऱ्या महागाईने सर्वसामान्य जनता भरडली जात आहे. याची सोयरसुतक कोणालाच नाही. सर्व मंडळी राजकारण करण्यात मग्न आहेत. रोज जीवनावश्यक वस्तूंचे दर वाढत आहेत. त्यामध्ये आता घरगुती गॅस सिलिंडरच्या दरवाढीची भर पडली आहे.
एक मार्चपासून घरगुती गॅस सिलिंडरचे दर ५० रुपयांनी वाढविण्यात आल्याने याबद्दल महिला वर्गातून संताप व्यक्त केला जात आहे. वाढणाऱ्या महागाईमुळे घरचे बजेट मात्र कोलमडले आहे.
गॅस दरवाढ झाली की, घरातील खर्चाचे नियोजन बिघडते. अगोदरच सर्व जीवनावश्यक वस्तूंचे दर वाढत आहेत. त्यात नुकतेच गॅसचे दरही वाढले आहेत. जुलै २१ पासून तब्बल ५ वेळा गॅसची दरवाढ झाली आहे. ही महागाई थांबणार केव्हा?
- संगीता कटारिया, गृहिणी, केत्तूर
सध्या महाग झालेले गॅस सिलिंडर घेणे परवडत नाही. तसेच गॅसला पर्यायही उरला नाही. सध्या सरपणही मिळत नाही. गॅसचे दर ५०० रुपयेपर्यंत ठीक आहेत. आता गॅसचा वापर काटकसरीने करावा लागणार आहे.
- चैताली माने, गृहिणी, केत्तूर