esakal | देशीचा पर्याय खुंटल्याने गावरानवर धूम; गावठी दारूसाठीही हा जिल्हा ठरतोय हॉटस्पॉट
sakal

बोलून बातमी शोधा

gavathi daru.jpg

जिल्ह्यात सद्या लॉगडाऊन असल्याने पोलिस प्रशासन व महसुलचे पथक दिवसभर रस्त्यावर फिरत असतांनाही त्यांना न जुमानता गावठी दारूचा महापूर प्रशासनासाठी आव्हान ठरत आहे.

देशीचा पर्याय खुंटल्याने गावरानवर धूम; गावठी दारूसाठीही हा जिल्हा ठरतोय हॉटस्पॉट

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नांदुरा (जि.बुलडाणा) : एकीकडे कोरोना विषाणूचे संक्रमण होऊ नये यासाठी शासनाने बार,वाइन शॉप, देशी दारूची दुकाने बंद ठेवली असल्याने तळीरामांची मोठी पंचाईत झाली आहे. त्यामुळे गावरान (गावठी) दारूला चांगलीच मागणी वाढली असून चढ्या भावाने ही गावरान दारू सहज उपलब्ध होत आहे. सध्या  जिल्ह्यात लॉगडाऊन असल्याने सर्व प्रकारची दुकाने बंद राहत असल्यामुळे मोहफुल विक्रीला आवर बसल्याने गावठी दारू बनविणाऱ्यानी चक्क गूळ, नवसागर तर रासायनिक केमिकलच्या माध्यमातून नदीकाठी आपले अड्डे बनवून तळीरामांना खुश करण्याची नामी संधी शोधत त्यांच्या आरोग्यावरच घाला घातला जात आहे.

कोरोनासाठी हॉटस्पॉट ठरणाऱ्या या जिल्ह्यात गावठी दारूचे अड्डे वाढल्याने दारूसाठीही हॉटस्पॉटमध्ये मोडणाऱ्या या जिल्ह्यात सद्या लॉगडाऊन असल्याने पोलिस प्रशासन व महसुलचे पथक दिवसभर रस्त्यावर फिरत असतांनाही त्यांना न जुमानता गावठी दारूचा महापूर प्रशासनासाठी आव्हान ठरत आहे. सध्या बुलडाणा जिल्ह्यात 17 कोरोनाबाधित रुग्ण सापडल्याने प्रशासनाची झोप उडाली आहे. 

हेही वाचा - पाच रुपयांच्या जेवणाकडे गरजूंची पाठ

हायरिस्क व हॉटस्पॉटमध्ये जिल्हा असल्याने प्रशासन योग्य ती काळजी घेत जिल्हावासियांना घरीच बसण्याचे आवाहन करीत असल्याने सिक्सटी, नाइनटी मारणाऱ्यांची खूप पंचाईत झाली आहे. संपूर्ण जिल्ह्यातील बार,वाइन शॉप व देशी दारूची दुकाने बंद असल्याने विशेष करून ग्रामीण भागात नदीकाठी बनविल्या जाणाऱ्या गावठी दारूला मोठे उधाण आले असून चढ्या भावाने खुलेआम या दारूची तस्करी मोठ्या प्रमाणात वाढली आहे.

घाटाखालील तालुक्यात तर या व्यवसायाला सुगीचे दिवस आले असून पूर्णा, विश्वगंगा या नदीकाठी तर अनेक नाल्याच्या आडोशाचा सहारा घेत दररोज हजारो लिटर गावठी दारू बनवून तळीरामापर्यंत सहज पोहचली जात आहे.यासाठी काही ठिकाणी पोलिसांनी छापे टाकून दारू पकडल्याचे प्रकरणे समोर येत असले तरी अनेक ठिकाणी हा व्यवसाय खुलेआम पोलिस व महसूल पथकाच्या गस्तीत सुरू आहे.एकप्रकारे इंग्लिशला चोरी छुपके देशीचा पर्याय सापडत असून देशीचा पर्यायही अनेक ठिकाणी खुंटत असल्याने गावरान(गावठी)दारू धुमधडाक्यात विक्रीस उपलब्ध होत आहे.यासाठी गस्त घालणाऱ्या पथकांनी गावकऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी हे अड्डे उद्ध्वस्त करण्याची गरज निर्माण झाली आहे.