दीक्षान्त समारंभासाठी न्या. बोबडे मुख्य अतिथी? 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 1 नोव्हेंबर 2019

नागपूर  : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचा 107 वा दीक्षान्त समारंभ डिसेंबर महिन्यात आयोजित केला आहे. या समारंभात मुख्य अतिथी म्हणून सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश म्हणून निवड करण्यात आलेले न्यायमूर्ती शरद बोबडे यांचे नाव सुचविण्यात आले आहे. त्यामुळे त्यांच्या उपस्थितीतच दीक्षान्त सोहळा होण्याची दाट शक्‍यता आहे. 

नागपूर  : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचा 107 वा दीक्षान्त समारंभ डिसेंबर महिन्यात आयोजित केला आहे. या समारंभात मुख्य अतिथी म्हणून सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश म्हणून निवड करण्यात आलेले न्यायमूर्ती शरद बोबडे यांचे नाव सुचविण्यात आले आहे. त्यामुळे त्यांच्या उपस्थितीतच दीक्षान्त सोहळा होण्याची दाट शक्‍यता आहे. 
न्या. शरद बोबडे नागपूर विद्यापीठाच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर विधी महाविद्यालयाचे विद्यार्थी आहेत. त्यांनी वकिलीची सुरुवात मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठातून केली. यानंतर याच खंडपीठाचे त्यांनी न्यायमूर्ती म्हणूनही कामकाज पाहिले. यानंतर सर्वोच्च न्यायालयात न्यायमूर्ती म्हणून पद भूषविण्याचा मान मिळाला. आता काही दिवसातच ते सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश म्हणून शपथ घेतील. विद्यापीठाचे विद्यार्थी आता सर्वोच्च पदावर विराजमान होणे, ही बाब विद्यापीठासाठी भूषणावह आहे. त्यामुळे त्यांनाच 107 व्या दीक्षान्त समारंभात प्रमुख अतिथी म्हणून बोलाविण्याचा विचार प्रशासन करीत आहे. त्यांची तारीख मिळताच दीक्षान्त समारंभाची तारीख ठरेल. 106 व्या दीक्षान्त समारंभात एचसीएलचे मुख्य व्यवस्थापकीय संचालक शिव नादर यांना प्रमुख अतिथी म्हणून बोलाविण्यात आले होते. या कार्यक्रमात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी विशेष अतिथी होते. त्यात 103 विद्यार्थ्यांना 183 पदक आणि प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आले होते. याशिवाय 532 पीएच.डी., 11 हजार 153 पदव्युत्तर तर 42 हजार 456 पदवींचे वितरण करण्यात आले. यापूर्वीही चार वर्षांत रिलायन्स उद्योग समूहाचे प्रमुख मुकेश अंबानी, टाटा उद्योग समूहाचे रतन टाटा आणि आयआयएम अहमदाबादचे संचालक डॉ. ऍरोल डिसुजा यांच्या नावाची चर्चा होती. मात्र, त्यांच्या तारखा न मिळाल्याने ते येऊ शकले नाही. यावेळी विद्यापीठ कुणाच्याही नावाची चर्चा न करता, गुप्त पद्धतीने अतिथींना बोलाविण्याच्या तयारीत असल्याचे दिसते. 
न्या. शरद बोबडे नागपूर विद्यापीठाचे विद्यार्थी आणि नागपूरचे भूषण आहेत. त्यांची उपस्थिती निश्‍चित विद्यापीठासाठी ऐतिहासिक क्षण ठरणारी राहील. चार ते पाच नाव अतिथी म्हणून समोर आहे. त्यात निश्‍चितच न्या. शरद बोबडेंचाही समावेश आहे. परंतु अतिथींच्या तारखा बघूनच निर्णय होईल. 
डॉ. सिद्धार्थविनायक काणे, कुलगुरू 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Get ready for the convocation. Bobde main guest?