कचरा, श्‍वानांपासून मुक्ती हवी

कचरा, श्‍वानांपासून मुक्ती हवी

नागपूर - मैदानावर कचरा टाकण्यात येत असल्यामुळे मोठा त्रास होतो. डासांचेही प्रमाण वाढले आहे. श्‍वानांमुळे बाहेर निघणे अवघड झाले आहे. वाहनांच्या मागे धावत असल्याने श्‍वानांपासून वाचवा. मैदानात असामाजिक तत्त्वांचा वावर असून, गांजा पिणारे बसून असतात. यांच्यापासून मुक्‍ती द्या, या सारखे अनेक प्रश्‍न बजाजनगरच्या नागरिकांनी नगरसेवक व पोलिसांसमोर मांडले. यातील काही प्रश्‍न १५ दिवसांत सोडविण्याचे आश्‍वासन नगरसेवक व पोलिसांनी दिले. सकाळ मोहल्ला सभा व वाचक संवादाच्या माध्यमातून अनेक प्रश्‍न निकाली निघण्यास मदत झाली.

दै. ‘सकाळ’तर्फे सामाजिक बांधीलकी म्हणून मोहल्ला सभा व वाचक संवादाचे आयोजन विविध प्रभागात करण्यात येत आहे. या सभांमधून परिसर आणि प्रभागांमध्ये असलेल्या विविध समस्या समोर आणून त्यांचे तत्काळ निदान करण्यासाठी प्रयत्न करण्यात येतो. याचाच एक भाग म्हणून गुरुवारी बजाजनगर येथील बास्केटबॉल मैदान येथे मोहल्ला सभा व वाचक संवाद पार पडला. प्रमुख पाहुणे नगरसेविका लक्ष्मी यादव, नगरसेवक लखन येरावार, बजाजनगरचे पोलिस निरीक्षक ज्ञानेश्‍वर पाटील, रमेश बक्षी, माजी नगरसेविका नीलिमा बावणे, सकाळ विदर्भ आवृत्तीचे  कार्यकारी संपादक शैलेश पांडे व मनोज देशपांडे उपस्थित होते. मोकाट श्‍वान, कचऱ्याची विल्हेवाट, गांजा पिणारे व अवैध हुक्‍का पार्लरवर नागरिकांनी चर्चा केली.

शैलेश पांडे यांनी सामाजिक जाणिवेतून ‘सकाळ’द्वारे विविध उपक्रम राबविण्यात येत असल्याचे सांगून मोहल्ला सभांमधून नागरिकांना तक्रारी थेट अधिकारी आणि पोलिसांसमोर मांडता येणे  शक्‍य होणार असल्याचे सांगितले. प्रास्ताविकातून प्रमोद काळबांडे यांनी ‘सकाळ’द्वारे राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती दिली. संचालन व आभार सहायक वितरण व्यवस्थापक रूपेश मेश्राम यांनी मानले.

‘सकाळ’ने चांगला उपक्रम सुरू केला आहे. यामुळे नागरिकांना समस्या थेट नगरसेवकांसमोर मांडता येतात. श्‍वानांचा प्रश्‍न गंभीर आहे. त्यामुळे श्‍वान पकडणाऱ्या वाहनांच्या संख्येत वाढ केली पाहिजे. सफाई कर्मचाऱ्यांची संख्याही वाढवायला पाहिजे. ‘सकाळ’चे तनिष्का व्यासपीठ महिलांसाठी चांगले आहे. महिलांसाठी कार्यशाळा व शिबिराचे आयोजन करावे.
- नीलिमा बावने, माजी नगरसेविका.

नगरसेवक व पोलिसांचे उत्तर
रोज कचरा उचलण्याची सूचना केली आहे. नागरिकांनीही आपली जबाबदारी पाळायला हवी.  कचरा रस्त्यावर टाकू नये. अधिकचे वाहन लावून लवकर प्रश्‍न निकाली निघेल. श्‍वानांवर कारवाई केली, तर एनजीओ आक्षेप घेतात. त्यामुळे तो मोठा प्रश्‍नच आहे. नागरिकांनी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करावी. गडर लाइनचा प्रश्‍न गंभीर आहे. त्यामुळे येथील मुख्य लाइनशी जोडण्याचे प्रस्तावित आहे.
- लखन येरावार, नगरसेवक.

मैदानात दोन सुरक्षा कर्मचाऱ्यांची नियुक्ती केल्यास धाक निर्माण होईल. पर्यायाने दारू पिणे बंद होईल. पोलिसांनी याची दखल घ्यायला हवी. अवैध बांधकामास परवानगी देणाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल. अधिकारी जाड चाकडीचे आहेत. त्यांच्याकडून भांडून कामे करून घ्यावी लागतात. नागरिकांचे प्रश्‍न महत्त्वाचे असून, ते निकाली काढण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्यात येईल.
- लक्ष्मी यादव, नगरसेविका.

अवैध कामांना पाठीशी घातले जाणार नाही. गांजा, दारू पिणारे व गोंधळ घालणाऱ्या मुलांची व त्यांच्या वाहनांची माहिती दिल्यावर नक्कीच कारवाई करण्यात येईल. नागरिकांनी १०० किंवा ०७१२-२२३२७७३ या क्रमांकावर फोन करावा. तक्रार करण्याचे नाव गुप्त ठेवण्यात येईल. नागरिकांचे संरक्षण हे आमचे कर्तव्य आहे.
- ज्ञानेश्‍वर पाटील, पोलिस निरीक्षक.

मातीचे ढिगारे आहेत. यामुळे सिवेज लाइनही चोक होते.
- उज्ज्वला काचरे

हॉल नसल्यामुळे महिलांना कार्यक्रम घेता येत नाही. त्यामुळे महिलांसाठी स्वतंत्र हॉल तयार केला पाहिजे. हॉस्पिटलही अधिक आहेत. येथे होणाऱ्या पार्किंगचा त्रास होतो. लोक येथेच राहतात. यामुळे दुपारी चोरींच्या घटनेत वाढ झाली आहे.
- हेमा आदमने

घराजवळच डस्टबिन आहे. नागरिक त्यात कचरा टाकण्याऐवजी बाजूला टाकतात. यामुळे कचरा उडून घराकडे येतो. त्यामुळे डस्टबिन काढून घ्यावी.
- प्रभा वैरागडे

श्‍वानांचा त्रास फार जास्त आहे. सायकल चालविताना श्‍वान धावून येतात. श्‍वानांना येथून हाकलून लावा.
- देवांश मानापुरे


नागरिकांचे प्रश्‍न 
सिमेंट रस्ते आणि मेट्रोच्या कामांमुळे वाहतुकीस अडचण होत आहे. यावर लक्ष देण्याची गरज असून, पर्यायी मार्गासंदर्भात माहिती द्यायला हवी.
- साहेबराव इंगळे

मैदानावर रात्रीच्या सुमारास गांजा व दारू पिणाऱ्यांचा हैदोस असतो. यामुळे नागरिकांना त्रास  होतो. येथे रात्रभर लाइट लावून ठेवावे लागतात. यामुळे वीजबिल जास्त येते. या उपद्रव्यापी मुलांचा बंदोबस्त केला पाहिजे. येथेच लोक कचराही टाकतात. ही समस्या लवकरात लवकर सोडविली पाहिजे.
- रमेश बक्षी

नागरिक मैदानात श्‍वान घेऊन येतात आणि ते घाण करतात. या श्‍वानांसाठी शौचालय तयार केले पाहिजे. रस्त्यांवर घाण करणाऱ्या श्‍वानांच्या मालकांना दंड करायला पाहिजे.
- ज्ञानेश्‍वर शेंद्रे

अनेक वर्षांपासून अवैध धंदे सुरू आहे. याची माहिती सर्वांना आहे. अनेकदा तक्रार केल्यावरही कारवाई केली जात नाही. यामुळे युवा पिढी वाईट मार्गावर जात आहे. यावर लवकरात लवकर कारवाई झाली पाहिजे.
- उमेश अनीखेंडी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com