टेकाडी - संताजीनगर स्थित झेरॉक्स दुकानात कार्यरत युवतीला स्थानीय तीसवर्षीय युवकाकडून विनाकारण बेदम मारहाण केल्याची घटना सोमवारी संध्याकाळी तीनच्या सुमारास घडली. घटनेचा संपूर्ण प्रकार दुकानातील सीसीटीव्हीमध्ये कैद झाला असून कन्हान पोलिसांनी आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. आरोपी अद्याप पसार आहे.
पीडित जखमी युवती विद्या बैदनाथ पाल (वय ३०, कामठी कॉलरी नंबर ३) ही धर्मराज शाळेच्या मागे संताजीनगर कांद्री येथे नेट कॅफेमध्ये काम करते. सोमवारी दुपारी तीनच्या सुमारास आरोपी युवक बबलू ओमरे हा मित्रांसह नेटकॅफेमध्ये झेरॉक्स काढण्यासाठी आला. झेरॉक्स काढल्यानंतर दुकानात कार्यरत युवतीने पैशाची मागणी केली. त्यावर मला ओळखत नाही का, दुकानाचा मालक कुठे आहे, या भाषेत युवक बोलला. युवतीकडून पैशाची मागणी होताच आरोपीने युवतीच्या कानशिलात मारली. प्रत्युत्तरात युवतीने आरोपीवर हात उगारला. त्यावर भडकलेल्या आरोपी बबलू उमरे याने युवतीला लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण करून अश्लील शिवीगाळ केली.
त्यानंतर त्याने दुकानातील सामानाची तोडफोड केली. घाबरलेली युवती मदतीसाठी ओरडायला लागल्यानंतर स्थानिकांनी प्रकरण सोडवण्याचा प्रयत्न केला. युवतीला रक्तबंबाळ स्थितीत सोडून आरोपी घटनास्थळावरून पसार झाला. दुकान मालकाला घटनेची माहिती मिळताच दुकानाकडे धाव घेतली. कन्हान पोलिस ठाण्याचे पीएसआय राजेंद्र पाली यांनी घटनास्थळी पोहचून युवतीला उपचारासाठी रुग्णालयात पाठवून पंचनामा केला. घटनेचा प्रकार सीसीटीव्हीमध्ये बंद असून पोलिसांनी फुटेज ताब्यात घेतले आहे. फिर्यादी पीडित विद्या पाल हिच्या तक्रारीवरून आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला असून फरार आरोपीचा शोध सुरू आहे.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.