खेळताना गळफास

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 29 एप्रिल 2018

नागपूर - खेळताना कपडे वाळविण्याच्या दोरीचा गळफास लागून अकरा वर्षीय बालिकेचा मृत्यू झाला. ही दुर्दैवी घटना शनिवारी दुपारी हुडकेश्‍वर हद्दीतील महाकालीनगरात घडली.

नागपूर - खेळताना कपडे वाळविण्याच्या दोरीचा गळफास लागून अकरा वर्षीय बालिकेचा मृत्यू झाला. ही दुर्दैवी घटना शनिवारी दुपारी हुडकेश्‍वर हद्दीतील महाकालीनगरात घडली.

स्नेहा दीपक चिंबारे असे मृत मुलीचे नाव आहे. तिचे वडील कॅटरिंगच्या कामासह मिळेल ते काम करतात. आईसुद्धा खासगी कामे करून संसाराला हातभार लावते. स्नेहाला तीन वर्षांचा धाकटा भाऊ आहे. कामाच्या निमित्ताने चिंबारे कुटुंब महाकालीनगरातील स्नेहाच्या मामाकडे वास्तव्यास आहे. तिथूनच मुलांचे शिक्षणही सुरू आहे. उन्हाळी सुट्या असल्याने स्नेहा तिची समवयस्क मामेबहिणी आणि भावासह दिवसभर खेळण्यात व्यस्त राहत होती. नेहमीप्रमाणे शनिवारी सकाळी सर्व जण कामावर निघून गेले. मामी तेवढ्या घरी होत्या. स्नेहा आणि तिची मामेबहीण वरच्या माळ्यावर खेळण्यासाठी गेल्या. बाहेर कपडे वाळत टाकण्यासाठी नायलॉनची दोरी बांधली आहे. त्याला ओढणीने बांधून दोघींचा खेळ सुरू होता. 

दरम्यान, मामेबहीण खोलीत गेली. स्नेहा बाहेर एकटीच होती. काही वेळाने मामेबहीण बाहेर आली. तिने स्नेहासोबत बोलण्याचा प्रयत्न केला; मात्र तिच्याकडून प्रतिसाद मिळत नव्हता. यामुळे घाबरून तिने खाली धाव घेत आईला याबाबत माहिती दिली. स्नेहाच्या मामीने वर जाऊन बघितले. ती लोंबकळलेल्या अवस्थेत होती. तातडीने बाहेर काढून तिला खासगी रुग्णालयात नेले. डॉक्‍टरांनी तपासून मेडिकलमध्ये जाण्याचा सल्ला दिला. मेडिकलच्या डॉक्‍टरांनी तपासताच मृत घोषित केले. 

हुडकेश्‍वर पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद करीत प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.

पालकांनी काळजी घेण्याची गरज
उन्हाळी सुट्या असल्याने बच्चेकंपनीची सध्या चंगळ सुरू आहे. खेळण्याच्या नादात मुलांचा मृत्यू होण्याच्या घटना दरवर्षी पुढे येतात. यामुळे पालकांनी खेळणाऱ्या मुलांकडे जातीने लक्ष देऊन काळजी घेण्याची आवश्‍यकता निर्माण झाली आहे.

Web Title: girl death by thump

टॅग्स