सावत्र वडिलाविरोधात मुलगी हायकोर्टात

सावत्र वडिलाविरोधात मुलगी हायकोर्टात

नागपूर : गेल्या वर्षी ऑक्‍टोबरमध्ये वेश्‍या व्यवसायातून सोडविण्यात आलेल्या 22 वर्षीय मुलीने सावत्र वडिलाविरोधात मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठामध्ये धाव घेतली आहे. तिला सावत्र वडिलाच्या ताब्यात देण्याचे आदेश नागपूर सत्र न्यायालयाने दिले होते. त्या आदेशाला तिने उच्च न्यायालयामध्ये आव्हान दिले.
अत्यंत गरिबीमुळे वकिलाची फी परवडणारी नसल्यामुळे तिला उच्च न्यायालयाच्या कायदेशीर सेवा उपसमितीकडून मदत दिली गेली. उच्च न्यायालयाने ऍड. स्वाती भाटिया यांना तिच्या खटल्याची सुनावणी करण्यासाठी नेमले.
ऍड. स्वाती भाटिया यांनी न्यायालयामध्ये बाजू मांडताना म्हटले की, मुलीच्या म्हणण्यानुसार प्रतिवादी हे तिचे वडील नाहीत. वय 22 वर्षे असल्याने तिला आपल्या जीवनाचा निर्णय घेण्याचा अधिकार आहे. त्यामुळे ती आपल्या वडिलांकडे जाण्यास तयार नाही. हाच व्यक्ती तिला वेश्‍या व्यवसायामध्ये ढकलण्यास जबाबदार आहे. या प्रकरणी उच्च न्यायालयाने सावत्र वडिलासह लंकडगंज पोलिसांना नोटीस बजावत उत्तर दाखल करण्याचे आदेश दिले. या प्रकरणाची पुढील सुनावणी 23 सप्टेंबर रोजी होणार आहे. सुनावणीदरम्यान वसतिगृहाचे अधिकारी चंद्रशेखर नारनवरे आणि समुपदेशक लता कांबळे उपस्थित होत्या. गेल्या वर्षी 6 ऑक्‍टोबरला शहरातील गंगाजमना परिसरातील शारदा बिल्डिंगवर छापा टाकताना लकडगंज पोलिसांकडून या मुलीची सुटका करण्यात आली होती. त्यानंतर, तिला इतर मुलींसह करुणा महिला वसतिगृहात पाठविण्यात आले. न्यायमूर्ती विनय देशपांडे यांच्या खंडपीठाने हे आदेश दिले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com