शिक्षिकेच्या मारहाणीत विद्यार्थिनी गंभीर 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 12 जानेवारी 2019

ब्रह्मपुरी (जि. चंद्रपूर) : लिहिणे, वाचणे न आल्याने शिक्षिकेने विद्यार्थ्यांना काठीने बेदम मारहाण केली. या मारहाणीत एका विद्यार्थिनीच्या पायाला गंभीर दुखापत झाली. ही घटना तालुक्‍यातील दुधवाही येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत शुक्रवारी (ता. 11) दुपारी साडेबाराच्या सुमारास घडली. याप्रकरणी शिक्षिकेविरुद्ध पोलिस ठाण्यात तक्रार करून निलंबनाची मागणी करण्यात आली आहे. 

दुधवाही येथील शाळेत गीता चिंतामण फुलसे या 2015 पासून शिक्षिका म्हणून कार्यरत आहेत. शुक्रवारी दुपारी फुलसे या अध्यापनासाठी वर्गात गेल्या. वाचणे, लिहिणे याचे प्रात्यक्षिक घेतले. यावेळी अनेक विद्यार्थ्यांना बरोबर लिहिता, वाचता आले नाही. त्यामुळे संतापलेल्या शिक्षिकेने अंकिता एकनाथ कोरडे, सौंदर्या दिगांबर मेश्राम, तुषार सचिन सोनवाणे, शंतनू अविनाश धुर्वे, दिव्या मिथुन नेवारे, सानिया सुभाष दुनेदार, अंश शुद्धोधन शंभरकर, आराध्या प्रमोद नागपुरे, कुंदन प्रवीण बन्सोड, शंतनू राजेश्वर नाहाले या विद्यार्थ्यांना बांबूच्या काठीने मारहाण केली. 

शिक्षिकेचा रुद्रावतार बघून विद्यार्थ्यांनी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष गजानन नागापुरे यांच्या घराकडे धाव घेतली. नागापुरे हे विद्यार्थ्यांसह शाळेत दाखल झाले. मात्र, संबंधित शिक्षिका आणि मुख्याध्यापक आढळून आले नाही. यानंतर संतप्त पालकांनी विद्यार्थ्यांसह ब्रह्मपुरी पंचायत समिती गाठली. मात्र, अधिकारी हजर नसल्याने तहसीलदार विद्यासागर चव्हाण यांची भेट घेऊन घडलेला प्रकार सांगितला. जखमी विद्यार्थ्यांना ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. सौंदर्या दिगांबर मेश्राम (वय 8) या विद्यार्थिनीच्या पायाचा गंभीर दुखापत असल्याचे स्पष्ट झाले. यानंतर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. शिक्षिकेवर कारवाईची मागणी जिल्हा परिषद सदस्य ऍड. दीपाली मेश्राम यांनी केली आहे.

Web Title: a girl is injured in teachers hitting