प्रेमभंगातून युवतीची आत्महत्या

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 5 एप्रिल 2019

प्रियकराने लग्नाचे आमिष दाखवून प्रेमजाळ्यात ओढल्यानंतर दुसऱ्याच तरुणीच्या गळ्यात हात घालून फिरताना दिसल्यामुळे प्रेयसीने गळफास घेऊन आत्महत्या केली. या प्रकरणी प्रियकराविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याची तक्रार युवतीच्या भावाने केली आहे. अश्‍विनी बोरकर असे आत्महत्या करणाऱ्या युवतीचे नाव आहे. 

नागपूर - प्रियकराने लग्नाचे आमिष दाखवून प्रेमजाळ्यात ओढल्यानंतर दुसऱ्याच तरुणीच्या गळ्यात हात घालून फिरताना दिसल्यामुळे प्रेयसीने गळफास घेऊन आत्महत्या केली. या प्रकरणी प्रियकराविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याची तक्रार युवतीच्या भावाने केली आहे. अश्‍विनी बोरकर असे आत्महत्या करणाऱ्या युवतीचे नाव आहे. 

धंतोली परिसरात राहणाऱ्या अश्‍विनीचे एका युवकावर प्रेम होते. दोघांनी एकमेकांशी लग्न करण्याच्या आणाभाका घेतल्या. मात्र, गेल्या काही दिवसांपूर्वी त्याच्या जीवनात आणखी एक तरुणी आली. दोघांत मैत्री आणि नंतर प्रेमप्रकरण सुरू झाले. नवीन प्रेयसी मिळाल्यामुळे त्याने अश्‍विनीला टाळाटाळ करण्यास सुरुवात केली. त्यामुळे अश्‍विनी काही दिवसांपासून तणावात होती.

तिने प्रियकराची समजूत घालण्याचा प्रयत्न केला. मात्र, तो ऐकायला तयार नव्हता. शेवटी तणावातून अश्‍विनीने २९ मार्च रोजी घरात सिलिंग फॅनला गळफास घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, तिचा भाऊ घरी पोहचल्यामुळे अनर्थ टळला. बेशुद्धावस्थेत अश्‍विनीला मेडिकलमध्ये दाखल करण्यात आले. मात्र तिचा उपचारादरम्यान आज गुरुवारी दुपारी एक वाजता मृत्यू झाला. 

तिच्या मोबाईलच्या चॅटिंगवरून प्रियकराच्या त्रासाला कंटाळून तिने आत्महत्या केल्याचे लक्षात येताच, तिच्या भावाने धंतोली पोलिसांत तक्रार दिली. रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल झाला नव्हता.

Web Title: Girl Suicide By Love Disloyalty