अल्पवयीन मुली असुरक्षिततेच्या सावटात 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 21 जानेवारी 2017

भंडारा - अल्पवयीन मुलींचा विनयभंग व अत्याचाराच्या घटनांमध्ये लक्षणीय वाढ झाली असून, मुली असुरक्षित वातावरणाच्या सावटात असल्याचे चित्र जिल्ह्यात निर्माण झाले आहे. 

2016 मध्ये हा आकडा मोठा होता. नव्या वर्षाच्या सुरुवातीलाही हीच परिस्थितीत कायम आहे. 

भंडारा - अल्पवयीन मुलींचा विनयभंग व अत्याचाराच्या घटनांमध्ये लक्षणीय वाढ झाली असून, मुली असुरक्षित वातावरणाच्या सावटात असल्याचे चित्र जिल्ह्यात निर्माण झाले आहे. 

2016 मध्ये हा आकडा मोठा होता. नव्या वर्षाच्या सुरुवातीलाही हीच परिस्थितीत कायम आहे. 

जानेवारी महिन्यात तब्बल 9 घटना घडल्या. यात अल्पवयीन मुलींचे पलायन, वा फूस लावून पळवून नेल्याच्या चार, विनयभंगाच्या तीन तर लैंगिक अत्याचाराच्या दोन घटनांचा समावेश आहे. सातत्याने घडणाऱ्या या घटनांमुळे अल्पवयीन मुली व त्यांच्या पालकांमध्ये दहशत निर्माण झाली आहे. समाजातील विकृत प्रवृत्तींचा सामना अल्पवयीन मुलींना करावा लागतो. बऱ्याच वेळा त्यांच्यावर जवळचे नातेवाईक, शेजारी, सोबत शिकणाऱ्या समवयस्कांकडूनही अत्याचार केला जातो. परंतु, बऱ्याच वेळी भीतीपोटी त्या बोलत नाही. तोंड दाबून बुक्‍क्‍यांचा मार त्यांना सोसावा लागतो. दडपणामुळे मुलींच्या मनावर मानसिक परिणाम होण्याची शक्‍यताही नाकारता येत नाही. त्यामुळे पालकांनी सजगता दाखवून आपल्या पाल्यावर लक्ष ठेवण्याची व संवाद साधण्याची गरज आहे. अलीकडच्या काळात मोबाईल, सायबर कॅफे, सोशल मीडिया व सिनेमा यांचा विपरीत परिणाम युवा पिढीवर जाणवत आहे. त्यामुळे कुठलाही विचार न करता वाहवत जाण्याची प्रवृत्ती वाढीस लागली आहे. पालकांकडूनही मुलांना बरीच सवलत व मुभा दिली जाते. 

त्यामुळे स्वैरपण वाढत आहे. अनेक अल्पवयीन मुले-मुली शाळा, कॉलेज व शिकवणी वर्ग सुटल्यानंतर कुठेतरी निवांत शोधून तासन्‌तास वेळ घालवितात. यासाठी अनेक सायबर कॅफेचासुद्धा आसरा घेतला जातो. भंडारासारख्या लहान शहरातही, असे प्रकार वाढीस लागले आहेत. इतकेच नव्हे तर ग्रामीण भागापर्यंत ही पाळेमुळे रुजली आहेत. त्यामुळे शहरासह ग्रामीण भागातही अल्पवयीन मुलींनी पलायन वा पळवून नेल्याच्या घटनेत वाढ झाली आहे. 

ऑपरेशन मुस्कानची मदत 
तारुण्यांच्या उंबरठ्यावर असणाऱ्या मुलामुलींना समुपदेशन व मार्गदर्शनाची खरी गरज असते. 

परंतु, प्रत्यक्षात त्यांच्या मनात निर्माण होणारे प्रश्‍न व गुंता सोडविण्याचा प्रयत्न करण्यासाठी सामाजिक संस्थाही पुढे येत नाही. मध्यंतरी असा, प्रयत्न झाला होता; परंतु तोही बारगळला. 

पोलिस विभागाच्या ऑपरेशन मुस्कानच्या माध्यमातून अशा मुला-मुलींच्या घरवापसीसाठी शोधमोहीम राबविली जाते. अशा भरकटलेल्या, वाट चुकलेल्यांना मुस्कान मोहिमेतून त्यांच्या घरापर्यंत पोहोचविण्यात आले. मात्र, अशा घटनांची पुनरावृत्ती टाळावी यासाठी त्यांचे पालक, कुटुंबीय व शिक्षकांनीही जागृत राहण्याची गरज आहे. 

कायद्यांचा धाक बसेना 
सध्या देशात "दगंल' या सिनेमाने धूम घातली असून, आहे. त्यातील "छोरीयॉ छोरोसे कुछ कम नही' हा संवाद सर्वत्र गाजत आहे. परंतु, ही स्थिती फक्त रंजनापुरता मर्यादित न राहता, मुलींनी सक्षम, सजग व धैर्य बाळगण्याची वेळ आली आहे. सोबतच समाजाची विकृत मानसिकता बदलणे गरजेचे आहे. बाललैंगिक अत्याचाराला आळा घालण्यासाठी सरकारने पावले उचलली आहेत. अत्यंत कठोर कायदे करण्यात आले. अशा प्रकारचा गुन्हा करणाऱ्यांना कडक शिक्षेची तरतुद आहे. असे असतानाही अशा अप्रिय घटनाची संख्या कमी झालेली नाही. दिवसेंदिवस ती वाढत चालली आहे. त्यामुळे केवळ कायदे करून चालणार नाही. त्यांची अंमलबजावणीही झाली पाहिजे. 

Web Title: Girls molested increase in abuse cases