घर द्या घर

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 23 ऑक्टोबर 2019

नागपूर : रमाई घरकुल योजनेचे काम अतिशय संथ गतीने सुरू असून गेल्या तीन वर्षांत 10 हजार घरकुल वाटपाच्या उद्दिष्टापैकी फक्त 883 लोकांनाच याचा लाभ मिळाला. त्यामुळे या योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना "घर द्या घर', असेच म्हणण्याची वेळ आली आहे.

नागपूर : रमाई घरकुल योजनेचे काम अतिशय संथ गतीने सुरू असून गेल्या तीन वर्षांत 10 हजार घरकुल वाटपाच्या उद्दिष्टापैकी फक्त 883 लोकांनाच याचा लाभ मिळाला. त्यामुळे या योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना "घर द्या घर', असेच म्हणण्याची वेळ आली आहे.
रमाई घरकुल योजनेअंतर्गत सामाजिक न्याय विभागामार्फत अनुसूचित जाती, नवबौद्ध घटकांना घर देण्यात येते. गरीब, घर नसलेल्या लोकांना प्राधान्य देण्यात येते. या योजनेमुळे अनेक बेघरांना डोक्‍यावर छत मिळाले. मात्र गेल्या काही वर्षांत याला घरघर लागल्याचे चित्र आहे. नागपूर जिल्ह्यात गेल्या तीन वर्षांत म्हणजे वर्ष 2016-17 ते 2018-19 या काळात 10 हजार 381 घरकुलांचे उद्दिष्ट निश्‍चित करण्यात आले होते. यातील 6728 घरकुलांना मंजुरी देण्यात आली. प्रत्यक्षात 883 घरकुलांचे काम पूर्ण झाल्याची माहिती आहे. अशी परिस्थिती राज्यातील इतर जिल्ह्यांची असल्याचे सांगण्यात येते. या योजनेकडे सामाजिक न्याय विभागाचे दुर्लक्ष झाले आहे. त्यामुळे याचा फटका गरीब वर्गाला बसत आहे. जमीन आणि घराचे भाव आकाशाला भिडले आहेत. त्यामुळे घराचे स्वप्न पूर्ण करणे गरिबांच्या आवाक्‍याच्या बाहेर झाले आहे. शासनाच्या योजनेच्या माध्यमातून अनेकांचे घराचे स्वप्न पूर्ण झाले आहे. मात्र गेल्या काही वर्षांची आकडेवारी पाहता ही योजनाच गुंडाळण्याच्या प्रयत्नात विभाग आहे की काय, असाच सवाल उपस्थित होत आहे.

निराधारांना आधार देणे, विकास करण्यासाठी शासन, प्रशासन, लोकप्रतिनिधी आहे. या योजनेसाठी त्यांनी काय केले, हे विचारण्याची गरज आहे.
- ई. झेड. खोब्रागडे, माजी सनदी अधिकारी.

नागपूर जिल्ह्यात 2016-17 ते 2018-19 या 3 वर्षांतील आकडेवारी
1. नागपूर महानगरपालिका उद्दिष्ट 2300, मंजूर 426 व पूर्ण 126
2. नागपूर ग्रामीण उद्दिष्ट 6289, मंजूर 6119 व पूर्ण 747
3. नगरपालिका - नगरपंचायत, उद्दिष्ट 1792 मंजूर 183 व पूर्ण 12


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Give the house a home