'पाचशे नागरिकांच्या उपस्थितीत कार्यक्रम घेण्याची परवानगी द्या'; कोरोनाच्या सावटातही अजब मागणी 

मिलिंद उमरे 
Monday, 28 September 2020

give permission to gathering of 500 people for program 
या निवेदनात म्हटले आहे की, 22 मार्चच्या मध्यरात्रीपासून देशात सर्वत्र लॉकडाऊन करण्यात आल्यापासून मंडप, डेकोरेशन, कॅटरर्सचे काम ठप्प पडले आहे.

देसाईगंज (गडचिरोली) : देशात कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर निर्माण झालेल्या बिकट परिस्थितीमुळे येथील मंडप, डेकोरेशन, कॅटरर्स यांच्यावर उपासमारीची वेळ आली असल्याने यातून सावरण्यासाठी किमान पाचशे नागरिकांच्या उपस्थितीत कार्यक्रम घेण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी देसाईगंज तालुका डेकोरेशन, कॅटरर्स संघटनेच्या वतीने राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना देसाईगंजचे उपविभागीय अधिकारी विशाल मेश्राम यांच्यामार्फत दिलेल्या निवेदनातून करण्यात आली आहे.

या निवेदनात म्हटले आहे की, 22 मार्चच्या मध्यरात्रीपासून देशात सर्वत्र लॉकडाऊन करण्यात आल्यापासून मंडप, डेकोरेशन, कॅटरर्सचे काम ठप्प पडले आहे. गेल्या कित्येक वर्षांपासून याच व्यवसायाच्या माध्यमातून उदरनिर्वाह सुरू असुन दरम्यान कार्यक्रमाचे आयोजन बंद करण्यात आल्याने संबंधित व्यवसाय पूर्णत: ठप्प पडले आहेत. 

‘लस’ वाहून नेताना तापमान स्थिर, स्मार्ट हेल्थ केअरसाठी पोर्टेबल व्हॅक्सिन कोल्ड बॉक्स

सामाजिक, वैवाहिक, धार्मिक व राजकीय कार्यक्रमांना स्थगिती देण्यात आल्याने रोजगाराच्या संधी हिरावल्या गेल्या असून या व्यवसायाशी निगडीत हजारो कुटुंबांवर उपासमारीची वेळ आली आहे. जगण्याचा कोणताही आधार उरला नसल्याने अतिशय हलाखीचे जीवन जगावे लागत आहे. 

त्यामुळे आलेल्या बिकट स्थितीतून बाहेर काढण्यासाठी नियमांच्या अधिन राहून किमान पाचशे लोकांच्या उपस्थितीत कार्यक्रमाचे आयोजन करण्याची परवानगी देण्यात यावी, अशी मागणी संघटनेच्या वतीने राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना देसाईगंजचे उपविभागीय अधिकारी विशाल मेश्राम यांच्या मार्फत दिलेल्या निवेदनातून करण्यात आली आहे. .

कुणाच्या खांद्यावर कुणाचे ओझे?, चक्क कपाशीच्या शेतात घेतले गांजाचे पीक

हे निवेदन उपविभागीय अधिकारी विशाल मेश्राम यांनी स्वीकारले असून यावेळी संघटनेचे अध्यक्ष रिजवान खानानी, उपाध्यक्ष तेजराम हरडे, सदस्य श्‍यामराव खुणे, युसूफ खान, भाऊराव ठाकरे, राजू माकोडे, मोहन माकोडे, शशिकांत चिटमलवार, युवराज पंचभाई, भीमराव सुखदेवे, लव्हाजी दुनेदार, शंकरराव मैंद, नीलकंठ सहारे, फिरोज खान आदी पदाधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते.

संपादन - अथर्व महांकाळ 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: give permission to gathering of 500 people for program