सुखाच्या झोपेला सोशल मीडियाची लागली नजर - डॉ. सुशांत मेश्राम

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 17 मार्च 2017

नागपूर - सुखाची झोप कुणाला नको? पण, धकाधकीच्या आणि ताणतणावाच्या  बदलत्या जीवनशैलीने निसर्गदत्त देणगी असलेल्या झोपेला नजर लागली. महत्त्वाकांक्षेने झेप घेतली खरी, परंतु झोप उडवली. व्हॉट्‌सॲप, फेसबुकसारख्या सोशल मीडियाच्या व्यसनामुळे झोपेची वजाबाकी झाली. आठ तासांचे झोपणारे चार तासांच्या झोपेवर समाधान मानू लागले. यामुळे झोपेच्या आजारांना निमंत्रण मिळाले. झोपेचे आजारही किती...तर चक्क ८८ प्रकारचे. यातील ४४ टक्के पुरुष आणि २८ टक्के स्त्रिया घोरण्याच्या आजाराने त्रस्त आहेत, हे विशेष.

रात्री उशिरापर्यंत व्हॉट्‌सॲप आणि फेसबुकवर असल्यास शरीरातील मास्टर हार्मोन असलेले ‘मिलॅटोनियन’ कमी होते. यामुळे झोपेचे आजार निश्‍चित होतील. आगामी दशकात याचे परिणाम दिसतील, असा दावा स्लिप मेडिसीन विषयात ‘जॉन्स हॉपकिन्स मेडिकल युनिव्हर्सिटी’तून पदवी पूर्ण करणारे डॉ. सुशांत मेश्राम यांनी केला. आयुष्यातील ३३ टक्के वेळ माणूस झोपण्यात घालवतात. परंतु, माहिती तंत्रज्ञानाच्या युगात जागतिकीकरण, शहरीकरण, औद्योगिकीकरणामुळे मनुष्य झोपेपासून दुरावला.

झोपेचे गणित सोडवा
‘क्‍वालिटी ऑफ स्लिप’साठी विशेष व्यायामाचे तंत्र आहेत. झोपेत व्यक्तीचा मेंदू चार प्रकारच्या स्थितीमधून प्रवास करतो. झोपेच्या स्थितीमध्ये घेतली जाणारी झोप ही ७० मिनिटांची असते. याला नॉन रॅपिड आय मूव्हमेंट स्लिप असे संबोधले जाते. डोळ्यांच्या हालचालीसोबत होणारी झोप २० मिनिटांची असते. झोपेचे एक चक्र ९० मिनिटांचे असते. असे झोपेचे ४ चक्र  असतात. हे चक्र योग्यरीत्या हाताळण्यासाठी ‘बायोलॉजीकल क्‍लॉक’ मेंदूमध्ये आहे. झोपेचे हे गणित चुकले की, चिडचिडेपणा सुरू होतो. 

झोपेचे गणित चुकले तर...
झोप न येणे, झोपेत श्‍वास थांबणे, खाटेवर पडल्यानंतर तत्काळ झोप येणे, झोपेत फिट येणे, झोपेत घोरणे, दैनंदिन लयीचे आजार, गाढ झोपेत असताना मेंदू जागा होणे, अचानक काही काळासाठी स्मृतिभ्रंश होणे, विसरभोळेपणा, दिवसा थकल्यासारखे वाटणे, झोपेतून उठताना  थकवा जाणवणे, कधी एकदम आनंद तर कधी एकदम दुःख, मुलांमध्ये अतिक्रियाशीलता, झोपेत लघवी करणे, अभ्यासात मन न लागणे, झोपेतून उठताना पुन्हा झोपेची इच्छा मनात असणे अशाप्रकारचे ८८ आजार होतात, असे डॉ. मेश्राम म्हणाले.

वयोमानानुसार ‘स्टॅण्डर्ड’ झोप  
० ते १ वर्षे    २० ते २२ तास 
१ ते ५ वर्षे    १२ ते १५ तास
५ ते १२ वर्षे    १० तास
१२ ते १८ वर्षे    ०९ तास
१८ ते ४५ वर्षे    ०८ तास
४५ ते पुढे    ०६ तास

Web Title: global sleep day