पत्रकारिता समाजसेवेचे गौरवशाली माध्यम

छायाचित्र
छायाचित्र

नागपूर : पत्रकारिता समाजसेवेचे गौरवशाली माध्यम आहे. तत्त्व, मूल्यांशी तडजोड न करता पत्रकार समाजाची निर्भीडपणे सेवा करीत आहेत. त्याची कोणतीही किंमत लावली जाऊ शकत नाही, असे प्रतिपादन तमिळनाडूचे राज्यपाल बनवारीलाल पुरोहित यांनी केले.

विदर्भ गौरव प्रतिष्ठान व नागपूर श्रमिक पत्रकार संघाच्या वतीने सोमवारी प्रेस क्‍लब येथे आयोजित अनिलकुमार स्मृती पत्रकारिता पुरस्कार वितरण सोहळ्यात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी माजी खासदार अजय संचेती होते. याप्रसंगी विदर्भ गौरव प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. गिरीश गांधी, उपाध्यक्ष सत्यनारायण नुवाल, नागपूर श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष ब्रह्माशंकर त्रिपाठी, पत्रकार ट्रस्टचे विश्‍वस्त प्रदीप मैत्र, राहुल पांडे उपस्थित होते. बनवारीलाल पुरोहित यांच्या हस्ते ज्येष्ठ पत्रकार धर्मेंद्र जोरे व जोसेफ राव यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला. 21 हजार रुपये रोख, शाल, श्रीफळ, पुष्पमाळ व स्मृतिचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप होते.
नागपूरच्या पत्रकारितेला देदीप्यमान इतिहास राहिला आहे. अन्य कोणत्याही क्षेत्राप्रमाणे कुणाचीही शिफारस पत्रकारितेच्या क्षेत्रात चालत नाही. दिल्ली, मुंबई, आसाम, मेघालय, तमिळनाडू अशा देशाच्या वेगवेगळ्या ठिकाणी राहण्याचा योग आला. देशाच्या कोणत्याही क्षेत्रापेक्षा विदर्भातील पत्रकारिता अधिक उजवी आहे. या क्षेत्रात तपश्‍चर्या करावी लागते. पत्रकारितेत नव्याने येऊ इच्छिणाऱ्यांनी तत्त्वे, मूल्ये जपा, संयम राखा, तडजोड स्वीकारू नका, पारदर्शकतेने कार्य करा, असा हितोपदेश बनवारीलाल पुरोहित यांनी दिला. अजय संचेती यांनी जोसेफ राव, धर्मेंद्र जोरे यांचे अभिनंदन केले. स्वागतपर भाषण प्रदीप मैत्र यांनी तर प्रास्ताविक डॉ. गिरीश गांधी यांनी केले. संचालन रेखा दंडिगे यांनी तर वर्षा बासू यांनी आभार मानले.

लिखाणातून शालजोडीतले मारणे आवडते
लिहा असे की रक्तही निघेल आणि घावही होणार नाही, असाच प्रयत्न नेहमी केला आहे. लिखाणातून शालजोडीतले मारणे आपल्याला आवडत असल्याचे धर्मेंद्र जोरे यांनी सत्काराला उत्तर देताना सांगितले. कुटुंबीय व मित्रांच्या उपस्थितीत मिळत असलेला हा मान सर्वांत मोठा पुरस्कार असल्याचे ते म्हणाले. सोशल मीडियावरून प्रसारित होणारी माहिती सर्वाधिक विखारी आहे. यामुळे कोणत्याही माहितीची सत्यता पडताळून पहा, नंतरच सांगोपांग विचार करून लिहा, असा सल्ला त्यांनी पत्रकारांना दिला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com