गो गो हनी सिंगं!

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 24 जानेवारी 2019

नागपूर : पॉप गायक हनी सिंग याला तूर्तास थायलंड दौऱ्यावर जाण्याची सशर्त परवानगी जिल्हा व सत्र न्यायालयाने दिली आहे. फेब्रुवारी व मार्च महिन्यातील लाइव्ह शोसाठी विदेश दौऱ्यावर जाण्याची परवानगी मागणारा विनंती अर्ज हनी सिंगने सत्र न्यायालयात दाखल केला होता. अर्ज स्वीकारून किमान एका दौऱ्याची परवानगी भेटल्याने हनी सिंगला दिलासा मिळाला.

नागपूर : पॉप गायक हनी सिंग याला तूर्तास थायलंड दौऱ्यावर जाण्याची सशर्त परवानगी जिल्हा व सत्र न्यायालयाने दिली आहे. फेब्रुवारी व मार्च महिन्यातील लाइव्ह शोसाठी विदेश दौऱ्यावर जाण्याची परवानगी मागणारा विनंती अर्ज हनी सिंगने सत्र न्यायालयात दाखल केला होता. अर्ज स्वीकारून किमान एका दौऱ्याची परवानगी भेटल्याने हनी सिंगला दिलासा मिळाला.
अश्‍लील गाण्यांच्या प्रकरणात नागपूर जिल्हा व सत्र न्यायालयाच्या परवानगीशिवाय विदेशात जाऊ नये, या अटीवर हनी सिंगला अटकपूर्व जामीन मंजूर करण्यात आला होता. हनी सिंगला 24 जानेवारी ते 5 फेब्रुवारी या काळात थायलंड येथे कार्यक्रमासाठी जायचे होते. त्यासाठी त्याने विनंती अर्ज दाखल केला होता. न्यायालयाने आज त्याला तूर्तास थायलंड दौऱ्यावर जाण्याची अनुमती दिली, मात्र, या दौऱ्यात न्यायालयाच्या आदेशांचा अवमान होईल असे कुठलेही कृत्य करू नये, असेही न्यायालयाने बजावले आहे. शिवाय थायलंड दौऱ्याची तिकिटे, त्याचे मुक्कामाचे ठिकाण, विदेशातील संपर्क क्रमांक आदी माहिती न्यायालयात सादर करण्यास सांगितले. दौऱ्यानंतर 6 फेब्रुवारीला न्यायालयाला रिपोर्ट करण्याचे आदेशही हनी सिंगला दिले आहेत. 5 ते 10 फेब्रुवारी या काळात दुबईत तर 1 ते 31 मार्च या काळात ऑस्ट्रेलिया येथेही त्याचे शो आहेत. हनी सिंगला अनुमती दिल्यास तो भारताबाहेर पळून जाईल, त्यामुळे त्याला अनुमती देऊ नका, अशी विनंती ऍड. रसपालसिंग रेणू यांनी न्यायालयाला केली होती. जब्बल यांच्यातर्फे ऍड. रसपालसिंग रेणू, हनी सिंगतर्फे ऍड. अतुल पांडे व ऍड. आशीष किल्लेदार यांनी बाजू मांडली.
अद्याप व्हॉइस सॅम्पल नाहीच
पॉप गायक हनी सिंग आणि संगीतकार बादशहा यांच्याविरुद्ध माहिती व तंत्रज्ञान कायद्यान्वये कारवाई करावी, अशा आशयाची याचिका आनंदपालसिंग जब्बल यांनी दाखल केली. आरंभी हनी सिंगविरुद्ध तक्रार दाखल करण्याकरिता याचिकाकर्ते जब्बल पोलिस ठाण्यात गेले होते. परंतु, पोलिसांनी तक्रार घेण्यास नकार दिल्यानंतर त्यांनी प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी कोर्टात तक्रार दाखल केली. परंतु, जेएमएफसीने त्यांचा अर्ज नाकारल्याने त्यांनी हनी सिंगविरुद्ध उच्च न्यायालयाने कारवाई करावी, अशी विनंती करणारी याचिका दाखल केली. उच्च न्यायालयाने नोटीस बजावताच पोलिसांनी हनी सिंगविरुद्ध गुन्हा दाखल केला. पाचपावली पोलिस ठाण्यात येऊनही व्हॉइस सॅम्पल न दिल्याने याचिकाकर्त्यांनी उच्च न्यायालयात अवमान याचिका दाखल केली. त्यानंतर सेशन कोर्टाने त्याला अटींवर जामीन मंजूर केला होता.

Web Title: Go Go Honey Singh court news