गोकुळच्या नोकरभरतीला स्थगिती - महादेव जानकर

सकाळ न्यूज नेटवर्क
शनिवार, 14 जुलै 2018

नागपूर - कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ गोकुळच्या जुलै 2018 पासून सुरू केलेल्या 429 पदांच्या मेगा भरतीप्रक्रियेला दुग्धविकासमंत्री महादेव जानकर यांनी तात्पुरती स्थगिती देण्यात आल्याची घोषणा शुक्रवारी विधान परिषदेत केली.

नागपूर - कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ गोकुळच्या जुलै 2018 पासून सुरू केलेल्या 429 पदांच्या मेगा भरतीप्रक्रियेला दुग्धविकासमंत्री महादेव जानकर यांनी तात्पुरती स्थगिती देण्यात आल्याची घोषणा शुक्रवारी विधान परिषदेत केली.

विधान परिषदेत आमदार सतेज पाटील यांनी कोल्हापूर येथील गोकुळच्या 429 पदांच्या नोकरभरतीबाबत लक्षवेधी सूचना मांडली होती. पाटील यांनी या भरतीप्रक्रियेत गैरव्यवहार झाल्याचे सांगून ही प्रक्रिया त्वरित स्थगित करण्याची मागणी केली होती. कोल्हापूर जिल्हा बॅंकेची भरतीप्रक्रिया करताना बॅंकेला वेगळा न्याय आणि दूध संघाला वेगळा न्याय का, असा सवालही करण्यात आला. त्यावर दुग्धविकासमंत्री महादेव जानकर यांनी सरकारचे या दूध संघात भागभांडवल नाही. सहकार खात्याच्या नियमानुसार ही भरतीप्रक्रिया सुरू असल्याचे सांगितले. पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय खात्याने मागासवर्गीय भरती आरक्षणाची तरतूद केली नसल्याचे त्यांनी सांगितले. यावर शेकापचे आमदार जयंत पाटील यांनी आक्षेप घेतला.

सहकार खात्याकडे दूध संघाची नोंदणी होते. त्यामुळे त्यालाही सहकार कायदा लागू होतो. शाहू महाराजांनी मागासवर्गीय आरक्षणाची भूमिका प्रथम मांडली त्या कोल्हापुरात मागासवर्गीय आरक्षणाची भूमिका डावलली जात असेल, तर हे चुकीचे आहे. या प्रकरणाची सीआयडी चौकशी करावी; तसेच भरतीप्रक्रियेला त्वरित स्थगिती द्यावी, अशी मागणी केली. त्यानंतर जानकर यांनी या भरतीप्रक्रियेची चौकशी सहकार खात्यामार्फत सुरू असल्याचे स्पष्ट केले.

मग चौकशी का?
सरकारचे भागभांडवल नाही; मग सहकार खात्यामार्फत चौकशी का सुरू आहे? म्हणजेच सरकारचा हस्तक्षेप आहे. त्यामुळे त्वरित या भरतीप्रक्रियेला स्थगिती देण्यात यावी, असे आमदार सुनील तटकरे म्हणाले; तर विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी भागभांडवल नाही; मग संचालक कसे नेमले, असा सवाल करून या भरतीप्रक्रियेत आरक्षणाचे पालन झाले नसल्याचे स्पष्ट केले.

Web Title: Gokul Milk Recruitment Stop Mahadev jankar