सोनसाखळी चोरट्यांना अटक

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 8 ऑगस्ट 2019

नागपूर :  शहर गुन्हेशाखेच्या अँटी चेन स्नॅचिंग पथकाने दोन सोनसाखळी चोरट्यांना मोठ्या शिताफीने अटक केली. आरोपींकडून एक लाख 40 हजार 200 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. सुमित जयकुमार दर्यानी (31) आणि कुणाल देवीदास गजभिये (34) दोघेही रा. आहुजानगर अशी आरोपींची नावे आहेत.

नागपूर :  शहर गुन्हेशाखेच्या अँटी चेन स्नॅचिंग पथकाने दोन सोनसाखळी चोरट्यांना मोठ्या शिताफीने अटक केली. आरोपींकडून एक लाख 40 हजार 200 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. सुमित जयकुमार दर्यानी (31) आणि कुणाल देवीदास गजभिये (34) दोघेही रा. आहुजानगर अशी आरोपींची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरात दिवसेंदिवस सोनसाखळी चोरीच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. त्यासाठी पोलिस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांनी पीआय भीमराव खणदाळे यांच्या मार्गदर्शनाखाली ऍन्टी चेन स्नॅचिंग पथक स्थापना केले. दरम्यान नंदनवन, वाडी आणि सीताबर्डीत सोनसाखळी चोरीच्या तीन घटना घडल्या. पीएसआय हेमंत थोरात, हवालदार सुरेंद्रकुमार पांडे आणि योगेश सेलोकार यांनी तीन ठिकाणी भेट देऊन पाहणी केली. एका घटनास्थळावर बजाज एव्हेंजर दुचाकी संशयास्पद दिसून आली. दुचाकीची पाहणी केली असता समोरील नंबर प्लेट दुमडलेली होती. त्यावरून त्या दुचाकीस्वाराचा पथकाने शोध सुरू केला. त्यासाठी पोलिसांनी खबऱ्यांची मदत घेतली.
दोन दिवसांपूर्वी दोन्ही चोरटे जरीपटका हद्दीतील दयानंद पार्कजवळ रस्त्याने ये-जा करणाऱ्या महिलांना संशयास्पद नजरेने टेहळणी करीत होते. ही माहिती खबऱ्याने पोलिसांना दिली. पोलिस पथक घटनास्थळी पोहचताच दोघांनीही पळ काढण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी दोघांनाही पकडून त्यांची सखोल विचारपूस केली असता त्यांनी नंदनवन, वाडी आणि सीताबर्डीत सोनसाखळी चोरल्याची कबुली दिली. नंदनवन आणि वाडी येथे दोघांनीही मिळून तर सीताबर्डी येथे सुमीतने एकट्याने गुन्हा केला होता. त्यांच्याजवळून सोन्याचे मंगळसूत्र, सोनसाखळी, सोन्याचे पदक आणि दुचाकी असा 1 लाख 40 हजार 200 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.  

 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Gold chain thieves arrested