सोन्याचे दर स्थिरावले

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 23 ऑक्टोबर 2019

नागपूर ः धनत्रयोदशीचा मुहूर्त साधून सोने व चांदी खरेदी करण्यासाठी ग्राहकांनी तयारी सुरू केली आहे. दिवाळीच्या पूर्वीच सोन्याच्या दरात घसरण झाल्याने नागरिकांच्या चेहऱ्यावरील हास्य फुलले आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याची मागणी कमी झाल्याने सोन्याच्या दरात घसरण होत आहे. नागपुरात सोन्याच्या किमतीत किंचित घट झाली.

नागपूर ः धनत्रयोदशीचा मुहूर्त साधून सोने व चांदी खरेदी करण्यासाठी ग्राहकांनी तयारी सुरू केली आहे. दिवाळीच्या पूर्वीच सोन्याच्या दरात घसरण झाल्याने नागरिकांच्या चेहऱ्यावरील हास्य फुलले आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याची मागणी कमी झाल्याने सोन्याच्या दरात घसरण होत आहे. नागपुरात सोन्याच्या किमतीत किंचित घट झाली.
दिवाळीच्या सणांमध्ये सोन्या-चांदीची खरेदी करण्यासाठी अनेक जण उत्सुक असतात. धनत्रयोदशी आणि दिवाळी पाडव्याच्या दिवशी सोन्या-चांदीची खरेदी करणे शुभ मानले जाते. त्यासाठी अनेकजण दरवर्षी धनत्रयोदशीच्या दिवशी सोनं खरेदी करतात. सोन्याच्या दरात किंचित घसरण झाल्यामुळे सोन्याचा दर 38,375 रुपये प्रतिदहा ग्रॅमवर पोहोचला आहे. गेल्या आठ दिवसांपासून सोन्याचे दरात किंचित चढ-उतार सुरू आहे. सोन्याचे भाव स्थिर असल्याने ग्राहकही आता दागिने खरेदीसाठी बाहेर पडू लागला आहे. त्यामुळे सराफा बाजारातील वर्दळ वाढण्याची शक्‍यता आहे. सणासुदीच्या काळात सोन्याची मागणी वाढेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात असल्याने सराफा बाजार सज्ज झाला आहे. सोबतच आंतरराष्ट्रीय बाजारातही मागणी कमी झाली आहे. यामुळे सराफा बाजारात 24 कॅरेट सोन्याच्या दर आठ दिवसांपासून स्थिरावले आहेत.
एकीकडे सोन्याच्या दरात घसरण झाली आहे तर दुसरीकडे चांदीचा दरही स्थिरावला असल्याचे पाहायला मिळत आहे. सोमवारी चांदीच्या दरात 50 रुपयांची वाढ झाली आहे. या वाढीमुळे चांदीचा दर 46,000 रुपये प्रतिकिलो ग्रॅमवर पोहोचला आहे. अमेरिका-चीन यांच्यात सुरू असलेल्या व्यापार युद्धामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या दरात घसरण झाली असल्याचे बोलले जात आहे.
अमेरिकन डॉलरच्या तुलनेत रुपया एक टक्‍क्‍यांनी घसरला आहे. रुपया घसरल्याने 2019 मध्ये सोन्याच्या किमतीत वाढ होऊन चांगला परतावा मिळाला आहे. त्यामुळे हे वर्ष उत्तम ठरले आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा सोन्याचा परतावा 21 टक्के आहे. इक्विटीने फक्त दहा टक्के परतावा दिला आहे, असे मोतीलाल ओसवाल फायनान्स सर्व्हिसेसचे प्रमुख किशोर नरणे यांनी सांगितले.

गेल्या आठ दिवसांपासून किमती स्थिर असल्याने ग्राहकांनी या संधीचे सोने करून सोने खरेदीसाठी गर्दी करायला सुरुवात केली आहे. दिवाळीत सोन्याच्या किमती वाढतील, अशी अपेक्षा असल्याने आतापासून ग्राहकांनी दागिन्यांची बुकिंग सुरू केली आहे.
- सारंग रोकडे, संचालक, रोकडे ज्वेलर्स

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Gold prices stabilized