गोल्डीचा मेडिकल प्रवेश नियमित 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 22 मार्च 2017

नागपूर - 86 टक्के अपंग असल्याच्या कारणावरून वैद्यकीय अभ्यासक्रमासाठी प्रवेश नाकारलेल्या गोल्डी सुनकरवार हिला मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने न्याय मिळवून दिला. न्यायालयाच्या निर्णयाने केवळ तिचा वैद्यकीय शाखेतील प्रवेशच झाला नाही तर तिचा प्रवेश नियमित विद्यार्थ्याप्रमाणे करण्याचे निर्देशदेखील वैद्यकीय शिक्षण संचालनालयाला देण्यात आले. 

गोल्डी जन्मत:च हुशार विद्यार्थिनी असून, तिने एमबीबीएस अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी अनिवार्य असलेली परीक्षा 2012 मध्ये उत्तीर्ण केली. मात्र, ती 86 टक्के अपंग असल्याच्या कारणावरून तिला अपात्र ठरविण्यात आले. जेव्हा की ती 50 टक्के अपंग असल्याचे प्रमाणपत्र मेयोने दिलेले होते. यामुळे तिने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. न्यायालयाने या संपूर्ण प्रकारावर गंभीर नाराजी व्यक्त केली. तसेच मुंबई स्पेशल मेडिकल बोर्डनेदेखील गोल्डी 50 टक्केच अपंग असल्याचे घोषित केले. दरम्यानच्या काळात प्रवेशाची अंतिम मुदत संपली. यामुळे 22 ऑक्‍टोबर 2012 रोजी न्यायालयाने विशेष जागा तयार करण्याचे आदेश दिले. यानुसार गोल्डीला नागपुरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात प्रवेश मिळाला. मात्र, विशेष जागेला मान्यता नसल्याच्या कारणावरून आरोग्य विद्यापीठाने आक्षेप नोंदविला. याला गोल्डीने उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. त्यावर न्यायालयाने अंतरिम आदेश देत प्रवेश ग्राह्य केला होता. 

यानंतर एकदाही अनुत्तीर्ण न होता तिने फेब्रुवारी 2017 मध्ये पदवी शिक्षण पूर्ण केले. याप्रकरणी मंगळवारी (ता. 21) झालेल्या सुनावणीदरम्यान न्यायालयाने गोल्डीचा प्रवेश विशेष जागेवरून नियमित जागेवर करण्याचे निर्देश दिले. अपंग असूनही इतर विद्यार्थ्यांच्या तुलनेत चांगले गुण मिळविणाऱ्या गोल्डीच्या संघर्ष आणि जिद्दीला न्यायालयाच्या निर्णयामुळे यशाचे स्वरूप प्राप्त झाल्याची भावना विधी तसेच वैद्यकीय वर्तुळात व्यक्त केली जात आहे. गोल्डीतर्फे ऍड. राहील मिर्झा यांनी बाजू मांडली. 

Web Title: goldi sunkar medical admission