गोंदिया : अन्‌ त्यांनी घेतले आंदोलन मागे

गोंदिया : अखेर नगर परिषदेचे कुलूप उघडले.
गोंदिया : अखेर नगर परिषदेचे कुलूप उघडले.

गोंदिया : सप्टेंबर व ऑक्‍टोबर या दोन महिन्यांचे वेतन न झाल्याने येथील नगर परिषदेतील कर्मचाऱ्यांनी आठ नोव्हेंबरपासून कामबंद आंदोलन सुरू केले होते. दरम्यान, गुरुवारी (ता. 14) नगराध्यक्ष व मुख्याधिकाऱ्यांसोबत उशिरा झालेल्या सभेत वेतनाची मागणी मंजूर झाल्याने कर्मचाऱ्यांनी आंदोलन मागे घेतले.

त्यामुळे गेल्या पाच दिवसांपासून बंद असलेले नगर परिषदेचे कुलूप उघडले आहे. उद्या शुक्रवारपासून कामकाज पूर्ववत सुरू होणार आहे. शासनाचा भोंगळ कारभार अन्‌ अधिकाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे सप्टेंबर व ऑक्‍टोबर महिन्याचे वेतन तसेच दिवाळीनिमित्ताने फेस्टिव्हल ऍडव्हॉन्स कर्मचाऱ्यांना देण्यात आला नव्हता.

त्यामुळे कर्मचाऱ्यांची दिवाळी अंधारात गेली. उल्लेखनीय म्हणजे, नगर परिषद कर्मचाऱ्यांनी 23 ऑक्‍टोबरला नगर परिषद कर्मचारी संघटनेच्या वतीने मुख्याधिकाऱ्यांना अध्यक्ष जहीरभाई अहमद यांच्या नेतृत्वात पत्र देण्यात आले होते. या पत्राकडेही त्यांनी दुर्लक्ष केले. त्यामुळे कर्मचाऱ्यांनी कामबंद आंदोलन करण्याचा निर्णय घेतला होता.

कर्मचाऱ्यांनी 8 नोव्हेंबरला नगर परिषदेला कुलूप ठोकून कामबंद आंदोलन सुरू केले होते. गेल्या पाच दिवसांपासून नगर परिषदेला कुलूप होते. वेतन मिळेपर्यंत काम करणार नाही, असा पवित्रा कर्मचाऱ्यांनी घेतला होता.

त्यामुळे कामानिमित्त नगर परिषदेत आलेल्या नागरिकांना आल्यापावली परत जावे लागले. शहरात घंटागाड्या फिरणे बंद झाले होते. त्यामुळे शहरभर अस्वच्छतेने विळखा घातला होता. सगळीकडे दुर्गंधीयुक्त वातावरण निर्माण झाले होते.

अखेर गुरुवारी नगराध्यक्ष अशोक इंगळे आणि मुख्याधिकारी जाधव यांनी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन वेतन देण्याची कार्यवाही ताबडतोब केली जाईल, असे आश्‍वासन दिले. त्यामुळे कर्मचाऱ्यांनी कामबंद आंदोलन मागे घेतले. उद्या शुक्रवारपासून कामकाज पूर्ववत होणार असल्याची माहिती नगर परिषद कर्मचारी संघटनेचे तिलक दीप यांनी दिली.

अडलेल्या कामांना येणार गती
कामबंद आंदोलनादरम्यान अनेक कामे प्रलंबित राहिली. कामानिमित्त नगर परिषदेत आलेल्या अनेक नागरिकांना आल्यापावली परत जावे लागले. परंतु, आता कामबंद आंदोलन मागे घेतल्याने कर्मचारी अडलेल्या कामांना गती देणार आहेत. तिकडे शहरभर घंटागाड्यांचा आवाजही घुमणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com