आता बोला! धानखरेदीस सेवा सहकारी संस्थेचा नकार

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 8 डिसेंबर 2019

परतीच्या पावसामुळे धानाचे मोठे नुकसान झाले. अशातच काही शेतकऱ्यांनी धानाची कापणी करून मळणी केली. शेतकऱ्यांनी आधारभूत खरेदी केंद्रावर धानविक्रीसाठी नेले असता काळे व पाखर असल्याचे कारण सांगून सेवा सहकारी संस्थेने खरेदीस नकार दिला.

गोंदिया : शेतकऱ्यांचे धान खरेदीस सेवा सहकारी संस्थेने नकार दिल्याचा प्रकार गोरेगाव तालुक्‍यात उघडकीस आला आहे. या प्रकारामुळे चिंताग्रस्त असलेल्या शेतकऱ्याने तहसीलदारांकडे तक्रार केली. तहसीलदारांनी चौकशीचे आदेश दिले. मात्र, आजपर्यंत कोणतीही कारवाई करण्यात न आल्याने शेतकऱ्याने आंदोलनाचा इशारा दिला आहे.

गोरेगाव तालुक्‍यातील तेढा येथील विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेतर्फे आधारभूत खरेदी केंद्र सुरू करण्यात आले आहे. या केंद्रांतर्गत हौसीटोला येथील शेतकऱ्यांना धानाची विक्री करता येते. हौसीटोला येथील शेतकरी दामोदर राजाराम मुनेश्‍वर यांनी 22 नोव्हेंबरला 140 धानाची पोती तेढा येथील खरेदी केंद्रावर नेले. यावेळी खरेदी केंद्रावरील ग्रेडर व संचालक मंडळाने केवळ दोन पोती धानाची खरेदी केली. उर्वरित धान पावसामुळे खराब झाले असल्याचे कारण सांगृून खरेदीस नकार दिला.

Image may contain: one or more people and outdoor
संग्रहित छायाचित्र

चौकशी थंडबस्त्यात

मुनेश्‍वर यांनी सहकारी संस्थेला लेखी मागविले. यावर संस्थेने पुरवठा निरीक्षकाच्या उपस्थितीत 29 नोव्हेंबरला पंचनामा करून त्याची प्रत शेतकऱ्यास दिली. मात्र, त्यांचे समाधान न झाल्याने गोरेगाव तहसीलदारांकडे तक्रार करण्यात आली. तहसीलदारांनी यासंदर्भात चौकशीचे आदेश दिले आहेत. मात्र, मागील 15 दिवसांपासून चौकशी थंडबस्त्यात असल्याने शेतकऱ्यांची मानसिकता दिवसेंदिवस ढासळत आहे.

Image may contain: one or more people
संग्रहित छायाचित्र

पावसामुले धानाचे नुकसान

व्यापाऱ्यांकडून शेतकऱ्यांची लूट थांबावी, यासाठी आधारभूत धानखरेदी केंद्र सुरू करण्यात आले आहे. मात्र, केंद्रावरही धानाच्या प्रतवारीवर आक्षेप घेत खरेदीस नकार दिला जात आहे. यामुळे शेतकऱ्यांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. तेढा येथील प्रकार उघडकीस आला असला; तरी तालुक्‍यात अनेक ठिकाणी याचे अनेक उदाहरण आहेत. परतीच्या पावसामुळे अनेक शेतकऱ्यांच्या धानाचे नुकसान झाले. अशा शेतकऱ्यांचे धान राजरोसपणे खरेदी केले जात आहे. सहकारी संस्थेने आजवर खरेदी केलेल्या धानाची प्रतवारीवर प्रश्‍नचिन्ह निर्माण झाला आहे. यामुळे सर्व धानाची चौकशी करण्याची मागणी शेतकरी दामोदर राजाराम मुनेश्‍वर यांनी केली आहे.

हेही वाचा : ऐका होऽऽ ऐका... शंभर रुपयांत पाच जीन्स

विधानसभाध्यक्ष पटोले यांना निवेदन

तहसीलदारांनी केवळ चौकशीचे आदेश दिले. यानंतर कोणतीही कारवाई झाली नाही. धानाची पोती विक्रीविना सहकारी संस्थेच्या पटांगणावर पडलेली आहेत. यातील दोन पोती चोरीला गेली आहेत. यामुळे न्याय मिळत नसल्याने अन्यायग्रस्त शेतकऱ्याने रविवारी भारतीय किसान संघ व शिवसेनेच्या नेतृत्वात विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांना निवेदन दिले. यावेळी मंचावर उपस्थित आमदारांनी निवेदन देऊन याकडे त्यांचे लक्ष वेधले. शेतकऱ्यांना धानखरेदीस नकार मिळत असल्याने जगायचे कसे, हा प्रश्‍न निर्माण झाला आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: gondia : Denial of paddy purchase service co-operative sanstha