400 फूट खोदली बोअरवेल, तरीही लागले नाही पाणी 

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 4 December 2019

किंडगीपार येथील शेतकरी अनंतराम हरिणखेडे आपल्या दोन एकर शेतात भाताची शेती करून वृद्ध आई, पत्नी व दोन मुले यांचा उदरनिर्वाह करीत होते. भाताच्या शेतीकरिता पावसाची सोय नसल्यामुळे चार ते पाच वर्षांपूर्वी बोअरवेल खोदून शेतीला थोडेफार पाणी पुरवित होते.

आमगाव (जि. गोंदिया)  : शेतात दोन बोअरवेल खोदूनही पाणी न लागल्याने व्यथित झालेल्या शेतकऱ्याने विष पिऊन आत्महत्या केली. ही घटना मंगळवारी (ता. 3) सायंकाळी किंडगीपार येथे उघडकीस आली. अनंतराम लोटन हरिणखेडे (वय 55, रा. किंडगीपार) असे मृताचे नाव आहे. 

किंडगीपार येथील शेतकरी अनंतराम हरिणखेडे आपल्या दोन एकर शेतात भाताची शेती करून वृद्ध आई, पत्नी व दोन मुले यांचा उदरनिर्वाह करीत होते. भाताच्या शेतीकरिता पावसाची सोय नसल्यामुळे चार ते पाच वर्षांपूर्वी बोअरवेल खोदून शेतीला थोडेफार पाणी पुरवित होते. परंतु, या बोअरवेलला पाणी येत नसल्यामुळे विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेतून कर्ज काढले. नवीन बोअरवेल खोदण्याचा त्यांनी निर्णय घेतला. 

Image may contain: one or more people and closeup
अनंतराम हरिणखेडे 

काही दिवसांपासून होते तणावात 
शेतात पहिली बोअरवेल 400 फूटपर्यंत खोदूनही पाणी लागले नाही. त्याकरिता त्यांनी शेतात दुसऱ्या ठिकाणी दुसरी बोअरवेल खोदली. परंतु, या बोअरवेलला 350 फूट खोल खोदूनही पाणी लागले नाही. त्यामुळे ते काही दिवसांपासून तणावात होते. मंगळवारी (ता. 3) सकाळी ते शेतात गेले. 11 वाजेदरम्यान शेतात विष पिऊन ते घरी परत आले. घरी कुणालाही काही न सांगता ते झोपी गेले. परंतु, काही वेळातच त्यांची प्रकृती खालावल्यामुळे त्यांना प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. डॉक्‍टरांनी तपासणी केल्यानंतर त्यांना मृत घोषित केले. त्यांच्या या आत्महत्येमुळे गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.

क्लिक करा - हेल्मेटविना दुचाकीने सुसाट निघाले तीन मित्र, पुढे झाले असे...

बहाद्दरपुऱ्यात शेतकऱ्याची आत्महत्या 
अमरावती : जिल्ह्यातील भातकुली तालुक्‍याच्या बहाद्दरपूर येथील स्वत:च्या शेतात विष पिऊन आत्महत्या करण्याच्या प्रयत्न करणाऱ्या शेतकऱ्याचा बुधवारी (ता. चार) उपचारादरम्यान जिल्हा सामान्य रुग्णालयात मृत्यू झाला. जनार्दन काशीराम वानखडे (वय 60, रा. गणोजादेवी) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. श्री. वानखडे यांना 29 नोव्हेंबर रोजी प्रकृती गंभीर असल्याने उपचारासाठी इर्विनमध्ये दाखल केले होते. या प्रकरणी भातकुली पोलिसांनी अकस्मात मृत्यू अशी नोंद घेतली.

क्लिक करा - हेल्मेटविना दुचाकीने सुसाट निघाले तीन मित्र, पुढे झाले असे...
 

जिवंत वीजतारांना स्पर्श झाल्याने शेतकऱ्याचा मृत्यू 
गडचिरोली : मुलचेरा तालुक्‍यातील खुदीरामपल्ली येथील जगबंधू जुगल सूत्रधार (वय 26) या तरुण शेतकऱ्याचा शेतातील जिवंत वीज प्रवाहित तारांना स्पर्श झाल्याने बुधवारी (ता. 3) सकाळी मृत्यू झाला. बुधवारी सकाळी जगबंधू सूत्रधार हे दुलाल मनोरंजन पाल यांच्यासह आपल्या शेतावर कपाशीच्या पिकाला पाणी देण्यासाठी गेले होते. यावेळी तारेचे कुंपण ओलांडताना प्रवाहित वीजतारांना स्पर्श झाल्याने त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. कपाशीचे संरक्षण करण्यासाठी सूत्रधार यांनी शेताला तारेचे कुंपण केले होते. परंतु, या तारांवर वीजप्रवाह कुणी आणि कशासाठी सोडला, याविषयी तपास सुरू आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: gondia disappointed farmer suicide