बुधवारपासून पांढरी गाव अंधारात...कसे काय?

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 5 डिसेंबर 2019

वीजपुरवठा करणाऱ्या खांबावरील तारा तुटल्याने काही दिवसांपासून पांढरी येथील वीजपुरवठा खंडित झाला आहे. त्यामुळे पांढरी गाव अंधारात आहे. मात्र, याकडे महावितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष होत आहे.

पांढरी (जि. गोंदिया) : वीजपुरवठा करणाऱ्या खांबावरील तारा तुटल्याने पांढरी गाव अंधारात आहे. काही तारा लोंबकळत असल्याने अपघाताचा धोका वाढला आहे. महावितरण कंपनीने जीर्णावस्थेत असलेले वीजखांब त्वरित बदलवून नवीन खांब लावण्याची मागणी जोर धरत आहे.

पांढरी गावात सुरळीत वीजपुरवठ्यासाठी 140 वीजखांब उभारण्यात आले आहेत. यातील 80 खांब लोखंडी आहेत. मात्र ते जीर्ण झाले आहेत. यामुळे काही खांब वाकलेले आहेत. स्थानिकांनी कित्येकदा महावितरण कंपनीकडे वीजखांबाच्या समस्या मांडल्या; परंतु आजही स्थिती "जैसे थे'च आहे. परिसरातील अनेक ठिकाणातील वीजखांबांवरील तारा लोंबकळत असल्याने केव्हाही अपघात होण्याची शक्‍यता नाकारता येत नाही. मात्र, याकडे महावितरणचे दुर्लक्ष आहे.

वीज खांबावरील तारा तुटल्या

विशेष म्हणजे, कानोबा तलावाजवळच्या मुख्य मार्गावरील वीज खांबावरील तारा तुटल्याने गावातील वीजपुरवठा खंडित झाला आहे. खांबावरील वीजतारा रस्त्यावर पडून असल्याने अपघाताचा धोका वाढला आहे. रात्रीपासून वीजपुरवठा खंडित असल्याने नागरिकांना ये-जा करताना अडचणींचा सामना करावा लागत आहे.

पांढरी गाव केंद्रस्थानी असून, एकमात्र मुख्य मार्ग आहे. या मार्गावर दुचाकी, चारचाकी व जड वाहनांची वर्दळ असते. येथील वीजखांबावरील तारा लोंबकळत असल्याने मोठा अपघात होण्याची शक्‍यता नाकारता येत नाही.

वीजपुरवठा सुरळित करा

महावितरण कंपनी एखाद्या मोठ्या घटनेची वाट तर पाहत नाही, असा प्रश्‍न नागरिकांनी उपस्थित केला आहे. वीज महावितरण कंपनी दुरुस्तीच्या नावाखाली हजारो रुपये खर्च करीत आहे. मात्र, वीज खांबांची दुरुस्ती होत नाही. यामुळे नागरिकांमध्ये असंतोषाचे वातावरण पसरले आहे. या समस्येची गांभीर्याने दखल घेऊन वीजपुरवठा सुरळीत सुरू करावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

हेही वाचा : कौतुकास्पद! नवरदेवाऐवजी निघणार नवरीची वरात

गावकऱ्यांचा आंदोलनाचा इशारा

बुधवार रात्रीपासून पांढरी गावाचा वीजपुरवठा खंडित असताना वीज महावितरण कंपनीकडून कोणतीही कारवाई करण्यात आली नाही. गावात वीज कर्मचारी नाहीत. मागील अनेक महिन्यांपासूृन वारंवार वीजपुरवठा खंडित होत आहे. मात्र वीजदेयके वाढवून येतात. एखाद्या महिन्यात देयक न भरल्यास वीजपुरवठा खंडित केला जातो. यामुळे नागरिकांत महावितरण कंपनीप्रति असंतोष पसरला आहे. परिसरातील वीजपुरवठा त्वरित सुरळीत न केल्यास तीव्र आंदोलन उभारण्याचा इशारा पांढरीवासींनी दिला आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Gondia : electricity poll wire damage, pandhari village dark