ओबीसी जनगणनेसाठी महासंघाचा एल्गार 

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 4 December 2019

शासनाने ओबीसींची जनगणना करून त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणावे, या प्रमुख मागणीसह अन्य मागण्या ओबीसी संघर्ष कृती समिती, राष्ट्रीय ओबीसी महासंघाने केल्या आहेत. याबाबतचे निवेदन मंगळवारी (ता. 3) उपविभागीय अधिकाऱ्यांमार्फत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठविले आहे. 

गोंदिया : शासनाने 2021च्या राष्ट्रीय जनगणनेत ओबीसींच्या जनगणनेसाठी प्रपत्रात स्वतंत्र कॉलम तयार करून जनगणना करण्यात यावी. 2011मध्ये झालेल्या जातीनिहाय जनणनेची आकडेवारी त्वरित जाहीर करण्यात यावी. ओबीसींसाठी लागू करण्यात आलेली नॉन क्रिमिलेअरची अट त्वरित रद्द करण्यात यावी. खासगी उद्योगांत ओबीसी, एससी, एसटी प्रवर्गाला लोकसंख्येनुसार आरक्षण देण्यात यावे आदी मागण्यांसाठी ओबीसी कृती समितीने उपविभागीय अधिकाऱ्यांना मंगळवारी (ता. 3) निवेदन पाठविले आहे. 

एससी, एसटी, एसबीसी विद्यार्थ्यांना लागू असलेल्या शिष्यवृत्तीप्रमाणे ओबीसी विद्यार्थ्यांनाही 100 टक्के शिष्यवृत्ती लागू करावी. सरकारी नोकऱ्यांत ओबीसी, एससी, एसटीई सर्व प्रवर्गांतील रिक्त पदांची विशेष भरती मोहीम राबबावी. एससी, एसटी प्रवर्गातील शेतकऱ्यांप्रमाणे ओबीसी प्रवर्गातील शेतकऱ्यांना शासकीय योजनांचा लाभ देण्यात यावा. ओबीसी प्रवर्गातील कर्मचाऱ्यांना प्रमोशन आरक्षण देण्यात यावे. आरक्षणाची योग्यरीतीने अंमलबजावणी न करणाऱ्या अधिकाऱ्यांवर फौजदारी गुन्हा दाखल करून निलंबनाची कारवाई करावी, संविधानविरोधी शिक्षण नीतीला प्रतिबंध घालण्यात यावा, आदी मागण्यांचा निवेदनात समावेश आहे. 

Image may contain: 12 people, people standing
गोंदिया : नायब तहसीलदारांना निवेदन देताना संविधान मैत्री संघ.

यांनी दिले तहसीलदारांना निवेदन 

नायब तहसीलदार गीता सरोदे यांना निवेदन देताना अमर वराडे, एन. डी. किरसान, मनोज मेंढे, शिशिर कटरे, नामदेवराव किरसान, खेमेंद्र कटरे, सावन डोये, कैलास भेलावे, महेंद्र बिसेन, प्रेमलाल साठवणे, राजीव ठकरेले, प्रेमलाल गायधने, आशीष नागपुरे, सोमनाथ यादव, कमल हटवार, मोरेश्‍वर कुथे, राजेश साठवणे, चिरंजीव बिसेन, रमेश ब्राह्मणकर, उदापुरे, मुनेश्‍वर कुकडे, नरेंद्र सिंद्रामे उपस्थित होते. 

वैद्यकीय प्रवेशातील अन्याय सहन करणार नाही 

ओबीसी प्रवर्गातील विद्यार्थ्यांना वैद्यकीय प्रवेशात अटी लादण्यात आल्या आहेत. या अटी शिथिल करण्यात याव्यात. त्यांना गुणवत्तेनुसार वैद्यकीय क्षेत्रात प्रवेश देण्यात यावा; अन्यथा आंदोलन केले जाईल, असा इशारा कृती समितीने दिला आहे. 

संविधान मैत्री संघानेही दिले निवेदन 

ओबीसींची जनगणना करण्यात यावी. सरकारी नोकऱ्यांत आरक्षण देण्यात यावे, यासह अन्य मागण्यांसाठी संविधान मैत्री संघाने उपविभागीय अधिकारी गीता सरोदे यांना निवेदन दिले. निवेदन देताना संविधान मैत्री संघाचे संयोजक अतुल सतदेवे, सुनील भोंगाडे, कैलास भेलावे, रवी भांडारकर, सुरेश ठाकरे, माया मेश्राम, गौतमा चिंचखेडे, ऋषभ शिवहरे, पुरुषोत्तम मोदी, प्रमोद गजभिये, केशरीचंद बिसेन यांच्यासह समाजबांधव उपस्थित होते. 

हे वाचलंय काय? तळीराम मास्तराची "मधू"शाला
 

सडक अर्जुनीत आमदार चंद्रिकापुरे यांना निवेदन 


सडक अर्जुनी : आमदार चंद्रिकापुरे यांना निवेदन देताना पदाधिकारी.

सडक अर्जुनी : तालुका ओबीसी कृती समिती व ओबीसी सेवा संघाच्या वतीने ओबीसींच्या विविध मागण्यांचे निवेदन आमदार मनोहर चंद्रिकापुरे यांना देण्यात आले. निवेदन देताना भूमेश्‍वर चव्हाण, मधुसूदन दोनोडे, हरिश्‍चंद्र कोहळे, रोशन बडोले, हेमराज मेंढे, डॉ. मोहनलाल बघेले, नाजूकराम गहाणे, युवराज अंबुले, आशीष येरणे यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Gondia : Elgar of the Federation for the OBC Census