गोंदिया : गोंगले रेल्वेस्थानकाला असुविधांचे ग्रहण

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 14 नोव्हेंबर 2019

- उड्डाणपुलाची मागणी धूळखात
- फलाटावर मालगाडी तासन्‌तास उभी
- प्रवासांची होते गैरसोय
- प्रवाशांना रेल्वेलाइन ओलांडून  जावे लागते

पांढरी (गोंदिया) : रेल्वे प्रशासनाच्या दुर्लक्षित धोरणामुळे गोंगले येथील रेल्वेस्थानकाला असुविधांचे ग्रहण लागले आहे. त्यामुळे प्रवाशांना वर्षानुवर्षांपासून गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. उड्डाणपुलाची मागणीही धूळखात आहे. त्यामुळे जीव मुठीत घेऊन प्रवाशांना फलाट ओलांडावे लागत आहे.

नागझिरा व्याघ्र प्रकल्पाला लागून गोंगले रेल्वेस्थानक आहे. हे रेल्वेस्थानक इंग्रजकालीन आहे. येथून दोन्ही दिशेला दररोज अडीच हजारांवर प्रवासी प्रवास करीत असतात. विद्यार्थी, व्यापारी व कर्मचारी मोठ्या प्रमाणात ये-जा करीत असतात.

वाहतुकीच्या अपुऱ्या सोयी आणि प्रवासाच्या दृष्टीने परवडण्यासारखे असल्याने प्रवाशांनी रेल्वेच्या प्रवासाला अधिक पसंती दिली आहे. त्यामुळे 25 ते 30 गावांचे हे रेल्वेस्थानक केंद्रबिंदू ठरले आहे. प्रवाशांना बसण्याकरिता खुर्च्या, स्वच्छ पिण्याचे पाणी, फ्रिजर, फलाटाचे उंचीकरण, रंगरंगोटी ही कामे या स्थानकात झाली आहेत. मात्र, या तुलनेत असुविधादेखील अधिक आहेत.

'फलाटांची उंची वाढविल्याने प्रवाशांना चढण्या-उतरण्याकरिता प्रचंड त्रास सहन करावा लागतो. गावाच्या मुख्य मार्गाच्या विरुद्ध दिशेला रेल्वेस्थानक असल्याने प्रवाशांना रेल्वेलाइन ओलांडून रेल्वेस्थानकात जावे लागते. त्यामुळे अपघाताची शक्‍यता अधिक आहे.

यापूर्वी स्थानक परिसरात कित्येक घटना घडल्या आहेत. रेल्वेगाडीच्या शेवटच्या डब्याशेजारी बसलेल्या प्रवाशांना पाण्यासाठी भटकंती करावी लागते. रेल्वेस्थानकावर असलेल्या पिंपळाच्या झाडावर मधमाश्‍यांचे पोळे आहेत. कित्येकदा मधमाश्‍यांनी प्रवाशांवर हल्ला करून दवाखान्याचा रस्ता दाखवला आहे.

बहुतांशवेळा रेल्वेस्थानकाच्या फलाटावर मालगाडी तासन्‌तास उभी असते. त्यामुळे प्रवाशांना जीव धोक्‍यात घालून मालगाडीखालून जावे लागते. उड्डाणपुलाअभावी हा सारा प्रकार घडत असताना रेल्वे प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे.

प्रवाशांच्या निवेदनाला केराची टोपली
गोंगले रेल्वेस्थानकावर उड्डाणपूल देण्यात यावे, अशी मागणी प्रवासी व स्थानिक नागरिक वर्षानुवर्षांपासून करीत आहेत. त्यांनी याबाबतचे अनेक निवेदने रेल्वे प्रशासनाला दिले आहेत; तरीही प्रशासन त्यांच्या निवेदनाची दखल घेताना दिसून येत नाही. एखाद्याचा जीव गेल्यावर प्रशासनाला जाग येईल का, हा प्रश्‍नही प्रवाशांनी उपस्थित केला आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Gondia : Gongale Railway Station receives inconvenience