अन्‌ बिबट्याने घेतला झाडावर आश्रय

नवेगावबांध : झाडावर चढून असलेला बिबट.
नवेगावबांध : झाडावर चढून असलेला बिबट.

नवेगावबांध (जि. गोंदिया) : पिंपळगाव येथील मध्यभागात देवचंद शेंडे यांचे घर आहे. दुपारी बारा वाजेच्या सुमारास बिबट श्री. शेंडे यांच्या परसबागेतील बाभळीच्या झाडावर असल्याचे दिसून आले. झाडावर बिबट बसून असल्याचे समजताच त्यांनी आरडाओरडा करून गावकऱ्यांना माहिती दिली. क्षणभरात गावकऱ्यांमध्ये एकच खळबळ माजली

उत्सुकतेने बिबट बघायला दोन ते अडीच हजार लोकांचा जमाव देवचंदच्या घराभोवती गोळा झाला. याची माहिती नवेगावबांध वनविभागाच्या अधिकाऱ्यांना देण्यात आली. प्रादेशिक वनविभागाचे वनपरिक्षेत्राधिकारी रोशन दोनोडे यांच्या नेतृत्वात एन. के. सरकार, सहायक वनपरिक्षेत्राधिकारी शिंदे, श्री. बहुरे, वनरक्षक मिथुन चव्हाण यांनी घटनास्थळ गाठून गावकऱ्यांना शांत केले.

जाळे टाकून बिबट्याला पकडले

यानंतर झाडाच्या सभोवताल जाळे पसरवून बिबट्याला झाडाखाली उतरविण्याचा प्रयत्न केला. मात्र, बिबट्याने झाडावरून उडी घेत घटनास्थळावरून पोबारा काढला. यावेळी बिबट्याने एका पडक्‍या घराचा आश्रय घेतला होता. मागील भाग बंदिस्त असल्याने रेस्क्‍यू टीमच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी जाळे टाकून बिबट्याला पकडले. वनविभागाच्या चार तासांच्या रेस्क्‍यू ऑपरेशननंतर हे थरारनाट्य संपले. वनविभागाने बिबट्याला जंगलात नेऊन सोडल्यानंतर पिंपळगाववासींनी निःश्‍वास सोडला.


बिबट्याला जंगलात सोडले
बिबट पाच सहा महिन्यांचा असावा. चार-पाच दिवसांपासून गावासभोवताल उसाची शेती व जंगल लागून असल्याने बिबट्याचा पिंपळगावात वावर होता. काही लोकांना रात्रीला बिबट दिसला होता. रेस्क्‍यू ऑपरेशनंतर बिबट्याला जंगलात सोडले आहे.
- रोशन दोनोडे
वनपरिक्षेत्राधिकारी, नवेगावबांध.

अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट्याचा मृत्यू

साकोली (भंडारा) : राष्ट्रीय महामार्ग ओलांडून पलीकडे जात असलेल्या बिबट्याला भरधाव वेगात आलेल्या अज्ञात वाहनाने धडक दिली. यात बिबट्याचा जागीच मृत्यू झाला. ही घटना विरसी फाट्याजवळ शुक्रवारी रात्री घडली आहे.

वन्यप्राण्यांची संख्या

तालुक्‍यात नागझिरा व नवेगाव बांध व्याघ्र प्रकल्पाचे जंगल व्यापले आहे. येथे नैसर्गिक अधिवास मिळत असल्याने वन्यप्राण्यांची संख्या बऱ्याच मोठ्या प्रमाणात वाढली आहे. हे प्राणी खाद्य व पाण्याच्या शोधात भटकतात. परंतु, या जंगलाच्या मध्यभागातून मुंबई-कोलकाता हा राष्ट्रीय महामार्ग गेला आहे. या महामार्गावरून दिवसरात्र जड वाहनांची वाहतूक सुरू असल्याने वन्यप्राण्यांचे अपघातही वाढले आहेत.

बिबट जागीच ठार

शुक्रवारी रात्री विरसी फाट्यापासून काही अंतरावर महामार्ग ओलांडत असलेल्या बिबट्याला भरधाव वेगात आलेल्या अज्ञात वाहनाने धडक दिली. यात अंदाजे दोन वर्षे वयाचा बिबट जागीच ठार झाला. नागरिकांनी या घटनेची माहिती आज,सकाळी वनविभागाला दिली. त्यानंतर क्षेत्र सहाय्यक धोटे यांनी सहकाऱ्यांसोबत जाऊन घटनास्थळाचा पंचनामा व कारवाई केली. पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी शवविच्छेदन केल्यानंतर बिबट्याचा मृतदेह जाळण्यात आले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com