गोंदिया, भंडाऱ्याला गारपिटीने झोडपले

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 15 फेब्रुवारी 2018

गोंदिया/भंडारा - जिल्ह्यांतील अनेक भागांत मंगळवारी (ता. 13) रात्री साडेआठनंतर वादळवाऱ्यांसह पाऊस पडला. तिरोडा व गोरेगाव तालुक्‍यांना गारपिटीने झोडपले. त्यामुळे रब्बीसह भाजीपाला पिके जमीनदोस्त झाली. भंडारा जिल्ह्यातील तुमसर-मोहाडी तालुक्‍यांत काल मध्यरात्री गारपिटीसह जोरदार पाऊस झाला. तुमसरात पिंपळाच्या झाडावरील 400 वर पोपटांचा बळी गेला. विदर्भातील इतर ठिकाणी मात्र पावसाने उघडीप दिली.

गोरेगाव तालुक्‍यातील पिंडकेपार, खाडीपार, मुंडीपार, पाथरी, सिलेगाव, बोळुंदांसह अन्य गावांत गारांचा पाऊस झाला. बहुतांश ठिकाणी पक्षी मृतावस्थेत आढळले, तर काही ठिकाणी घरांवरचे छत उडाले. तिरोडा तालुक्‍यातील काही गावांत दीड फुटाचा गारपिटीचा थर जमा झाला होता. यात पिकांचे नुकसान झाले असून, आंब्यांचा मोहर गळून पडला. सडक अर्जुनी तालुक्‍यात एक म्हैस वीज पडून जागीच मृत्युमुखी पडली.

भंडारा जिल्ह्यात रविवारपासून (ता.11) अवकाळी पाऊस सुरू आहे. काल मध्यरात्री तुमसर व मोहाडी तालुक्‍यांत वादळवाऱ्यासह गारांचा वर्षाव झाला. सुमारे अर्धा तासपर्यंत लिंबाच्या आकाराच्या गारा कोसळल्या. कृषी विभागाने कर्मचाऱ्यांना सर्वेक्षणाचे आदेश दिले; मात्र अनेक विभागांतील कर्मचाऱ्यांची गायमुख महादेव यात्रेसाठी नियुक्ती केल्याने सर्वेक्षणाला विलंब होत आहे.

Web Title: gondia news vidarbha news hailstorm loss