दुर्दैवाने खरा ठरला हवामान खात्याचा अंदाज; शेतकऱ्यांच्या डोळ्यात आले पाणी

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 1 जानेवारी 2020

सरत्या वर्षाला निरोप अन्‌ नवीन वर्षाच्या स्वागतासाठी जिल्हावासी विशेषतः तरुणाई सज्ज झाली असताना 31 डिसेंबरला रात्री आणि 1 जानेवारीला सकाळी अवकाळी पावसाने जिल्हाभर हजेरी लावली. त्यामुळे त्यांच्या आनंदावर पाणी फेरले गेले. अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे धानही ओले झाले. बुधवारी सकाळी 10 नंतर दिवसभर ढगाळ वातावरण होते. 

 गोंदिया : पुढील दोन दिवस म्हणजे 2 व 3 जानेवारीला जिल्ह्यात पाऊस पडेल, असे संकेत हवामान खात्याने दिले आहे. एकूणच या वातावरण बदलामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. 2019 च्या डिसेंबर महिन्याच्या मध्यंतरी अवकाळी पावसाने जिल्ह्यात हजेरी लावली. ती अजूनही कायम आहे. कुठे तुरळक तर, कुठे मुसळधार पाऊस पडत आहे. 

या पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला आहे. कडाक्‍याच्या थंडीतही वाढ झाली आहे. अंगात ऊनी कपडे, डोक्‍यावर टोप घालूनच प्रत्येकजण बाहेर पडत आहे. आता अवकाळी पाऊस कधीही पडेल, या भीतीने रेनकोटदेखील जवळ बाळगावा लागत आहे. या पावसाने शेतकऱ्यांची चिंता मात्र अधिक वाढवली आहे. 

धान खराब होण्याची शक्‍यता 

कडधान्ययुक्त पिके शेतात डौलाने उभे असताना पावसाच्या माऱ्याने ही पिके जमीनदोस्त झाली आहेत. तूरपिकावर घाटेअळीचा प्रादुर्भाव झाला आहे. बहुतांश ठिकाणी भारी धानपिकाच्या कडपांवर पाणी गेले आहे. त्यामुळे हे धान खबरा होण्याची, अंकुरण्याची भीती आहे. 31 डिसेंबर व 1 जानेवारी जिल्ह्यात पाऊस पडेल, हे हवामान खात्याचे संकेत खरे ठरले असले तरी, पुन्हा 2 व 3 जानेवारीला बहुतांश ठिकाणी पावसाची शक्‍यता वर्तविण्यात आली आहे. 

आजाराने नागरिक हैराण 

त्यामुळे आणखी पुढील दोन दिवस जिल्हावासींना पावसाच्या फटक्‍याचा सामना करावा लागणार आहे. या वातावरण बदलाचा आबालवृद्धांच्या प्रकृतीवर परिणाम झाला आहे. ताप, सर्दी, खोकला, अशा आजारांनी डोके वर काढले आहे. शासकीय रुग्णालयांसह खासगी रुग्णालये रुग्णांच्या गर्दीने फुल्ल आहेत. 

असे का घडले? : वादावादीत पतीने घेतला गळफास

आधारभूत केंद्रांच्या लेटलतिफीमुळे शेतकरी बेजार 

शेतकऱ्यांनी खरीप हंगामातील धान शासकीय आधारभूत धान खरेदी केंद्रांवर विक्रीकरिता नेले आहेत. परंतु, धानाची मोजणी केव्हा होईल, याची शाश्‍वती नसल्याने आणि पावसाची हजेरी लागत असल्याने शेतकरी पूर्णतः बेजार झाला आहे. आधारभूत धान खरेदी केंद्र संचालकांचा लेटलतीफ कारभार याला कारणीभूत असल्याचा आरोपही बहुतांश शेतकऱ्यांनी केला आहे. ही स्थिती मुंडीकोटा परिसरात हमखास पाहावयास मिळत आहे. नातेवाइक असलेले किंवा जवळचे शेतकरी यांच्याच धानाची मोजणी करण्याला प्रथम प्राधान्य दिले जात असल्याचा प्रकारही उजेडात आला आहे. महिना-महिना धानाची मोजणी होत नसल्याचे मुंडीकोटा येथील शेतकऱ्यांनी सांगितले. 

 अवश्‍य वाचा : बापरे... चोरट्यांनी केले एटीएम लंपास

इंटरनेट सेवेलाही ग्रहण 

गोंदियात इंटरनेट सेवा विस्कळीत होण्याचा प्रकार काही नवीन नाही. दररोज कधीही, कोणत्याही क्षणी इंटरनेट, मोबाईल सेवा खंडित होत असते. त्यामुळे शासकीय, निमशासकीय, खासगी कार्यालयांतील कामांचा खोळंबा होतो. जिल्हास्थळी कामानिमित्त आलेल्या नागरिकांना आल्यापावली परत जावे लागते. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: gondia : tear in farmers eyes