शेतातील उभे पीक झाले जमीनदोस्त

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 28 ऑक्टोबर 2019

गोंदिया/ नवेगावबांध : गेल्या पंधरा दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसाने जिल्ह्यातील धानपिकांची राखरांगोळी झाली आहे. पावसामुळे उभे भारी धानपीक जमीनदोस्त झाले आहेत. त्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे.

गोंदिया/ नवेगावबांध :  पावसामुळे उभे भारी धानपीक जमीनदोस्त झाले आहेत. त्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. दरम्यान, शासन-प्रशासनाने सर्वेक्षण करून नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी होत आहे. एक लाख 90 हजार हेक्‍टरच्या वर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी हलक्‍या व भारी धानपिकाची लागवड केली होती. हलक्‍या धानाची कापणी बहुतांश शेतकऱ्यांनी दिवाळीपूर्वीच केली. हे धान विकून दिवाळी सण साजरा करावा, हा शेतकऱ्यांचा उद्देश होता. परंतु, ऐन दिवाळीतच अवकाळी पावसाने जिल्हावासींवर बरसात केली. त्यामुळे शेतकऱ्यांनी बांधीत कापून ठेवलेल्या कडपांवर पावसाचे पाणी गेले. या कडपा काळ्याकुट्ट झाल्या आहेत.
नवेगावबांध व परिसरात 26 ऑक्‍टोबरला दुपारी एक वाजेच्या दरम्यान अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. आमगाव तालुक्‍यात आज, सोमवारी पावसाच्या चांगल्याच सरी कोसळल्या. यामुळे हलक्‍यासह भारी धानाचे मोठे नुकसान झाले आहे.
अवकाळी पावसामुळे बांध्यांमध्ये उभे असलेले भारी धानपीक कोलमडून पडले. हलक्‍या धानाच्या कापून ठेवलेल्या कडपा पावसात भिजल्या. त्यामुळे हाती आलेले पीक गेले. उभ्या असलेल्या धान पिकावर मावा, तुडतुडा यासारखे रोग पसरले असताना या पावसाने फार मोठे नुकसान केले. कमी कालावधीच्या धानपिकाची कापणी नवेगावबांध, सावरटोला परिसरात सुरू आहे. कित्येकांनी दिवाळीच्या पूर्वी धानपिकाची कापणी केली होती. परंतु, पावसाने शेतकऱ्यांच्या तोंडाजवळ आलेला घास हिरावला आहे. दरम्यान, शासनाने वेळीच दखल घेऊन प्रशासनामार्फत धानपिकाचे सर्वेक्षण करावे व नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
दिवाळी अंधारातच
सणांचा राजा म्हणून ओळख असलेला यंदाचा दिवाळी सण शेतकऱ्यांसाठी अंधकारमय झाला. अवकाळी पावसाने त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद हिरावून घेतला. उभे पीक जमीनदोस्त झाले. त्यामुळे हवालदिल आणि आर्थिकदृष्ट्या संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना शासनाने मदत करावी, अशी मागणी होत आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: gondia : There was a standing crop in the fields