पीडित शेतकऱ्यांना प्रत्येकी पाच हजार रुपये देणार 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 1 डिसेंबर 2019

चिचगड परिसरात दोन दिवसांआड धानाचे पुंजणे जळाल्याने शेतकऱ्यांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या घटनेत एकूण 65 लाख रुपयांच्या वर नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

देवरी (जि. गोंदिया) : चिचगड परिसरातील पन्नासहून अधिक शेतकऱ्यांचे धानाचे पुंजणे बुधवारी (ता. 27) जळाल्यानंतर पुन्हा शुक्रवारी (ता. 29) रात्रीच्या सुमारास ककोडी, कडीकसा व गणुटोला येथील 13 शेतकऱ्यांचे धानाचे पुंजणे जळाले. दरम्यान, तालुका कॉंग्रेस कमिटीने तातडीची बैठक घेऊन पीडित शेतकऱ्यांना प्रत्येकी पाच हजार रुपये देण्याचे जाहीर केले. 

चिचगड परिसरात दोन दिवसांआड धानाचे पुंजणे जळाल्याने शेतकऱ्यांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या घटनेत एकूण 65 लाख रुपयांच्या वर नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. दरम्यान, या घटनेची माहिती आमदार सहसराम कोरोटे यांना मिळताच त्यांनी त्वरित तालुका कॉंग्रेसच्या शिष्टमंडळाला घटनास्थळी पाठवून झालेल्या नुकसानाचा अहवाल मागविला. धानाचे पुंजणे जळाल्याने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्याचा निर्णय कॉंग्रेस कमिटीने बैठकीत घेतला आहे. 

Image may contain: outdoor

कोरोटे भवनात तालुका कॉंग्रेसची सभा 

कॉंग्रेसकडून पीडित शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्याकरिता काही प्रयत्न करावे, अशा सूचना दिल्यात. यावरून शनिवारी (ता. 30) येथील कोरोटे भवनात तालुकाध्यक्ष संदीप भाटिया यांच्या अध्यक्षतेखाली तालुका कॉंग्रेसची सभा घेण्यात आली. सभेत पीडित शेतकऱ्यांना प्रत्येकी पाच हजार रुपये मदत देण्याचा निर्णय घेण्यात आला. शिवाय जिल्हा परिषद व शासनाकडून आर्थिक मदत मिळवून देण्याकरिता चर्चा करण्यात आली. सभेला माजी तालुकाध्यक्ष राधेश्‍याम बगडिया, ऍड. प्रशांत संगीडवार, डॉ. अनिल चौरागडे, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे वरिष्ठ कार्यकर्ते भय्यालाल चांदेवार, तालुका कॉंग्रेसचे महासचिव बळीराम कोटवार, युवक कॉंग्रेसचे कुलदीप गुप्ता, राजा कोरोटे, प्रशांत कोटांगले, शार्दूल संगीडवार, कमलेश पालिवाल यांच्यासह अन्य कार्यकर्ते उपस्थित होते. 

सामाजिक संस्था, राजकीय पक्षांनाही मदतीचे आवाहन 

Image may contain: food and indoor

धानाचे पुंजणे जळाल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. उदरनिर्वाहाचा प्रश्‍न त्यांच्यासमोर उभा ठाकला आहे. त्यामुळे सामाजिक संस्था व राजकीय पक्षांनीही शेतकऱ्यांना मदतीचा हात पुढे करावा, असे आवाहनही तालुका कॉंग्रेसने केले आहे. 

हेही वाचा  :"बिबी' हो तो ऐसी! मृताच्या कुटुंबाला देणार तीन हजार रुपये अन्‌ पाणी

 

आर्थिक मदत मिळवून देणार 
पीडित शेतकऱ्यांना अधिकाधिक नुकसानभरपाई मिळवून देण्याकरिता मी प्रयत्नशील आहे. जिल्हा परिषद विभाग व मुख्यमंत्री सहायता निधीतून आर्थिक मदत मिळवून देण्याकरिता पाठपुरावा करेन. 
- सहसराम कोरोटे, आमदार. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Gondia : The victim will pay Rs 5,000 each to the farmers