गोंदियात होणार चुरशीची लढत

मुनेश्‍वर कुकडे
रविवार, 11 ऑगस्ट 2019

गोंदिया : 2019 च्या लोकसभा निवडणुकीत भाजप-शिवसेना युतीने कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेस आघाडीला चारीमुंड्या चीत करीत भाजपची ताकद दाखवून दिली. असे असले तरी, 2014 च्या विधानसभा निवडणुकीत कॉंग्रेसने गोपालदास अग्रवाल यांच्या रूपाने गोंदियाचा गड कायम ठेवला. मध्यंतरी कॉंग्रेसचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी हातात कमळ धरले. त्यानंतर, आमदार गोपालदास अग्रवाल हेदेखील कमळ हाती घेणार अशा वावड्या उडाल्या. परंतु, त्यांनी ही अफवा असल्याचे सांगितल्याने चर्चेला पूर्णविराम मिळाला. तरीही कार्यकर्ते सैरभैर झाले आहेत.

गोंदिया : 2019 च्या लोकसभा निवडणुकीत भाजप-शिवसेना युतीने कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेस आघाडीला चारीमुंड्या चीत करीत भाजपची ताकद दाखवून दिली. असे असले तरी, 2014 च्या विधानसभा निवडणुकीत कॉंग्रेसने गोपालदास अग्रवाल यांच्या रूपाने गोंदियाचा गड कायम ठेवला. मध्यंतरी कॉंग्रेसचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी हातात कमळ धरले. त्यानंतर, आमदार गोपालदास अग्रवाल हेदेखील कमळ हाती घेणार अशा वावड्या उडाल्या. परंतु, त्यांनी ही अफवा असल्याचे सांगितल्याने चर्चेला पूर्णविराम मिळाला. तरीही कार्यकर्ते सैरभैर झाले आहेत. भाजपचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष रमेश कुथे, माजी जिल्हाध्यक्ष विनोद अग्रवाल यांची नावे उमेदवारीसाठी आघाडीवर आहेत. यापैकी एकाला तिकीट पक्की असल्याचे बोलले जाते. सध्या भाजपच्या दिशेने वारे वाहत असल्याने कॉंग्रेसचा गड असलेला गोंदिया विधानसभेचा विजयरथ भाजप रोखणार का? अशी चर्चा मतदारांमध्ये आहे.
जिल्हा मुख्यालय असल्याने गोंदिया मतदारसंघाच्या लढतीकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. कॉंग्रेसचे आमदार गोपालदास अग्रवाल यांनी 2014 च्या विधानसभा निवडणुकीत हॅट्ट्रिक मारली. तिन्ही रेजिममध्ये मतदारांनी त्यांच्या विकासाच्या संकल्पनेला साथ दिली. याचाच परिणाम म्हणून 2014 मध्ये त्यांनी 62 हजार 285 मते घेत भारतीय जनता पक्षाचे उमेदवार विनोद अग्रवाल यांचा पराभव केला. त्यांना 51 हजार 620 मते मिळाली होती. भाजपचे स्टार प्रचारक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विनोद अग्रवाल यांच्या प्रचारार्थ गोंदियात सभा घेतली होती. त्यामुळे विनोद अग्रवाल यांचा विजय निश्‍चित मानला जात होता. परंतु, गोंदिया विधानसभेत नरेंद्र मोदी यांची जादू चालली नाही. विकासाला मते देत येथील मतदारांनी गोपालदास अग्रवाल यांच्या झोळीत मतांचे भरभरून दान टाकले. तथापि, 2019 च्या निवडणुकीत भाजप-शिवसेना युतीने कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या दिग्गज नेत्यांचा पराभव केला. त्यामुळे यावेळचे गणित बिघडण्याची शक्‍यता वर्तविली जात आहे. त्यातल्या त्यात कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते भाजपच्या गळाला लागले आहेत. शिवाय राधाकृष्ण विखे पाटील कॉंग्रेसची साथ सोडून भाजपवासी झाले. आमदार गोपालदास अग्रवाल त्यांचे अत्यंत निकटवर्ती मानले जातात. त्यामुळे मध्यंतरीच्या कालावधीत आमदार गोपालदास अग्रवाल हे भाजपमध्ये जातील, अशा चर्चांना उधाण आले होते. मात्र ती अफवाच निघाली. यामुळे कार्यकर्ते सैरभैर झाले आहेत. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणूक कॉंग्रेसला घाम फोडणारी ठरेल असा अंदाज आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस महाजनादेश यात्रेनिमित्त गोंदियात आले असताना त्यांनी विधानसभा निवडणुकीकरिता गोंदियाची जागा भाजपच्या वाट्याला आल्याचे सांगितले. त्यामुळे गोंदिया विधानसभेतून भाजपकडून महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष रमेश कुथे तसेच माजी जिल्हाध्यक्ष विनोद अग्रवाल यांची नावे समोर आली आहेत. शिवसेनेतून भाजपमध्ये आलेले रमेश कुथे हे शिवसेनेच्या तिकिटावर दोनदा आमदार झाले आहेत. शिवाय जातीय समीकरणाचा आधार घेतला तर, कुथे यांची तिकीट पक्की असल्याचे बोलले जाते. दरम्यान, या वेळी भाजपकडून तिकीट न मिळाल्यास विनोद अग्रवाल यांनी अपक्ष निवडणूक लढण्याची तयारी केल्याचीही चर्चा आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: gondia vidhansabha constituency