सातव्या वेतन आयोगासाठी गोंडवानाच्या कर्मचाऱ्यांचे आंदोलन

गडचिरोली : येथील गोंडवाना विद्यापीठासमोर आंदोलन करताना कर्मचारी.
गडचिरोली : येथील गोंडवाना विद्यापीठासमोर आंदोलन करताना कर्मचारी.

गडचिरोली : अकृषी विद्यापीठीय शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगाच्या सुधारित वेतन संरचना लागू कराव्या, या प्रमुख मागणीसाठी येथील गोंडवाना विद्यापीठाच्या कर्मचाऱ्यांनी सोमवारी (ता. 10) काळी फीत लावून आंदोलन केले. या आंदोलनामुळे
विद्यापीठाच्या कामकाजावर परिणाम झाल्याचे दिसून आले.
गोंडवाना विद्यापीठ कर्मचारी संघटनेतर्फे अनेकदा शासनाकडे पाठपुरावा करण्यात आला. परंतु दखल घेतली जात नसल्याने कर्मचारी पुन्हा रस्त्यावर उतरले. विद्यापीठातील कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगाच्या सुधारित वेतन संरचना लागू कराव्या, सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजनेबाबत निर्गमित करण्यात आलेल्या शासन निर्णयान्वये रद्द करण्यात आलेले शासन निर्णय पूर्ववत लागू करावे, नक्षलग्रस्त भागात कार्यरत कर्मचाऱ्यांना एकस्तर वेतनश्रेणीचा लाभ द्यावा आदी मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात येत आहे.
गोंडवाना विद्यापीठ कर्मचारी संघटनेने आपल्या मागण्यांसाठी यापूर्वी 3 जून रोजी कुलगुरू व शिक्षण संचालकांना निवेदन दिले होते. परंतु प्रशासनाने दखल न घेतल्याने गोंडवाना विद्यापीठ कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष महादेव वासेकर यांच्या नेतृत्वात कर्मचाऱ्यांनी काळ्या फिती लावून कामकाजात सहभाग घेतला. सुमारे 80 कर्मचारी या आंदोलनात सहभागी झाले. 12 जूनपर्यंत काळी फीत लावून आंदोलन केले. 18 जूनला विभागीय सहसंचालक, तर 25 जूनला शिक्षण संचालकांच्या कार्यालयावर मोर्चा आणि 29 जूनला एक दिवसाचा लाक्षणिक संप करणार असल्याचे कर्मचारी संघटनेने म्हटले आहे.

जागेचा तिढा कधी सुटणार
गोंडवाना विद्यापीठाला प्रशासकीय कामकाज तसेच शैक्षणिक कामासाठी शंभर एकर जागेची आवश्‍यकता आहे. सेमाना लगतच्या झुडपी जंगलाचा प्रस्ताव वनविभागाने फेटाळल्याने खासगी जमीन खरेदीसाठी प्रयत्न केले जात आहेत. गोगावलगत 60 एकर जागा खरेदी करण्यात आली. मात्र या व्यवहारात राजकारण आड आल्याने येथील प्रक्रिया खोळंबली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com