हागदारीमुक्‍ती' नाही मनात; "गुडमॉर्निंग' पथक कोमात !

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 19 नोव्हेंबर 2019

शासनाकडून गावाची स्वच्छता राखण्यासाठी लाखो रुपयांचा निधी देण्यात आला. "घर तेथे शौचालय' हे धोरण राबवून गावभर घराघरांत शौचालये उभी झाली. परंतु, उघड्यावर शौचालय करण्याचे चित्र काहीच बदलले नाही, तर गावाच्या बाहेर "गोदरीमुक्त गाव' अशी फलके लावून संबंधित ग्रा. पं. प्रशासनाने आपली पाठ थोपटून धन्य समजण्यासारखा हा एकूण प्रकार असल्याची ग्रामस्थ चर्चा करीत आहेत

पचखेडी (जि.नागपूर) ः सकाळची वेळ... गावात प्रवेश होण्याआधी स्वच्छ अभियानाची फलके लावल्यावरून गाव किती स्वच्छ असेल, याची मनात कल्पनाच करीत असताना रस्त्याच्या बाजूला काही ग्रामस्थ मस्त उघड्यावर बसून कोवळया उन्हात "मोकळे' होण्याचा मनमुराद आनंद लुटतानाचे चित्र बघून या विरोधाभासावर रडावे की हसावे, असा प्रश्‍न निर्माण होतो. मदनापूर गावातही असेच काही अनुभवास मिळाले.

रस्त्याच्या दोन्ही बाजूला हागणदारीपासून मुक्‍ती मिळविण्यासाठी शासनाने अनेक योजना काढल्या. शौचालये बांधण्यास प्रोत्साहित केले. एवढे करूनही गावचे नागरिक मस्त रस्त्यावर बसून मनमुराद आनंद लुटताना प्रशासनाला ठेंगा दाखवित असतील तर याला काय म्हणावे? पचखेडी ग्रामपंचायत अंतर्गत येणारे मदनापूर गाव सध्या अस्वच्छतेमुळे पुरते चर्चेत आले आहे.

फोटो काढून निव्वळ प्रसिद्‌धी
कुही पं. स.अंतर्गत मोठा गाजावाजा करीत दोन ऑक्‍टोबरपासून संपूर्ण देशपातळीवर हागणदारीमुक्त गाव आणि स्वच्छता अभियान राबविण्यात येत असल्याचा ढिंडोरा पिटण्यात आला. या राष्ट्रीय कार्यक्रमाचा बोभाटाच जास्त करण्यात आला. परंतु पुढे काय झाले, याचे ज्वलंत उदाहरण मदनापूर येथे पाहावयास मिळते. विशेष म्हणजे गाव "स्वच्छता अभियान' फक्त फोटो काढून प्रसिद्धी मिळवण्यासाठी होते की काय, असे वाटू लागले आहे. एकटे मदनापूरच नव्हे तर पंचायत समितीमधील ग्रामीण भागात गावखेड्यापर्यंत मजबूत रस्ते गावाची एकीकडे शोभा वाढवितात तर त्याच रस्त्याच्या दुतर्फा उघड्यावर शौचास बसलेल्यांचे सकाळी सकाळीच "दर्शन' घडते.

प्रशासनाची दिशाभूल
उल्लेखनीय म्हणजे शासनाकडून गावाची स्वच्छता राखण्यासाठी लाखो रुपयांचा निधी देण्यात आला. "घर तेथे शौचालय' हे धोरण राबवून गावभर घराघरांत शौचालये उभी झाली. परंतु, उघड्यावर शौचालय करण्याचे चित्र काहीच बदलले नाही, तर गावाच्या बाहेर "गोदरीमुक्त गाव' अशी फलके लावून संबंधित ग्रा. पं. प्रशासनाने आपली पाठ थोपटून धन्य समजण्यासारखा हा एकूण प्रकार असल्याची ग्रामस्थ चर्चा करीत आहेत. पुरस्कारप्राप्त ग्रामपंचायतमध्ये असे विदारक चित्र बघावयास मिळत असेल तर मिळालेल्या पुरस्काराची दिशाभूल केल्याबद्दल संबंधित ग्रामपंचायत प्रशासक व पदाधिकाऱ्यांवर फौजदारी स्वरूपाचे गुन्हे का लावू नये,असे मत उघडपणे व्यक्‍त केले जात आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: "Good morning" squad in coma!