शेतकऱ्यांसाठी खुशखबर; मिळणार सवलती!

ola dushkal_new.jpg
ola dushkal_new.jpg

अकोला : यंदाच्या खरीप हंगामात अतिवृष्टीमुळे सोयाबीन, कापसासह इतरही पिकांचे अतोनात नुकसान झाले. हाता-तोंडाशी आलेला घास हिरावल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. शेतकऱ्यांच्या या स्थितीला खरीप पिकांच्या अंतिम पैसेवारीने सुद्धा मोहोर लावून असून जिल्ह्याची अंतिम पैसेवारी सरासरी 45 पैसे जाहीर करण्यात आली आहे. पैसेवारीने ओल्या दुष्काळावर शिक्कमोर्तब लावल्यामुळे दुष्काळग्रस्त गावांतील शेतकऱ्यांना विविध प्रकारच्या सवलतींचा मार्ग मोकळा झाला आहे. परंतु त्यासाठी शासन निर्णयाची प्रतीक्षा आहे.

खरीप पिकांची पैसेवारी महसूल विभाग कृषी विभागाच्या मदतीने दर वर्षी जाहीर करत असतो. या पैसेवारीचा संबंध दुष्काळासंदर्भात येत असल्यामुळे पर्जन्यमान कमी अथवा अधिक झाल्यानंतर पिकांच्या उत्पादकतेवरील परिणाम पैशाच्या स्वरूपात प्रकट करण्याचे सूत्र आहे. दरवर्षी 15 सप्टेंबरला जिल्‍ह्याची नजरअंदाज पैसेवारी जाहीर होते. त्यानंतर ३१ ऑक्टोबरला सुधारित व 31 डिसेंबरला अंतिम पैसेवारी जाहीर करण्यात येते.

या पैसेवारीनंतर शासन दुष्काळाची परिसीमा ठरवत असते. 50 टक्क्याच्या खाली पैसेवारी निघाल्यास पीक परिस्थिती गंभीर व 50 टक्क्याच्यावर निघाल्यास पीक परिस्थिती उत्तम हे पैसेवारीचे समीकरण आहे. खरीप पिकांची अंतिम पैसेवारी 50 पैशांपेक्षा कमी जाहीर केल्यास शेतकऱ्यांना शासनामार्फत विविध प्रकारच्या सवलती जाहीर करण्यात येतात. त्यासाठी शासन निर्णय काढून दुष्काळग्रस्त गावांसाठी सोई सवलती देण्यात येतात.

जिल्ह्याची सरासरी पैसेवारी 50 पैशांपेक्षा कमी आल्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे. जिल्ह्यात 1012 गावे असून, त्यातील 990 गावे खरीप पिकांची लागवडी योग्य आहेत. त्यामुळे यंदा पाहणी करण्यात आलेल्या 990 गावांमधील अंतिम पैसेवारी सरासरी 45 पैसे असल्याचे जिल्हा प्रशासनाच्या तपासणी अहवालातून स्पष्ट झाले आहे. त्यामुळे लवकरच शेतकऱ्यांना दुष्काळी सवरली लागू होतील.

दुष्काळग्रस्त गावांना मिळणार या सवलती

  • सहकारी कर्जाचे पुनर्गठन
  • शेतीशी निगडीत कर्जाच्या वसुलीस स्थगिती
  • कृषी पंपाच्या चालू वीज बिलात 33.5 टक्के इतकी सूट
  • रोजगार हमी योजनेअंतर्गत कामांच्या निकषांत काही प्रमाणात शिथीलता


दोन सवलती यापूर्वीच लागू
निसर्गाच्या अवकृपेमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना राज्यपाल कोश्‍यारी यांनी 16 नोव्हेंबर 2019 रोजी शासन निर्णय जारी करून दोन सवलती यापूर्वीच लागू केल्या आहेत. त्यामध्ये शालेय, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्कात माफी व शेतकऱ्याचा शेतसारा माफ करण्याचे आदेश दिले होते. त्यामुळे आता शेतकऱ्यांना इतर दुष्काळी सवलती लागू करण्यासाठी सरकारला शासन निर्णय काढावा लागेल.

तालुकानिहाय खरिप पिकांची पैसेवारी
तालुका                  गाव           पैसेवारी
अकोला                  181            48
अकोट                   185            43
तेल्हारा                  106            41
बाळापूर                 103            41
पातूर                     94              46
मूर्तिजापूर              164             46
बार्शीटाकळी           157             45
एकूण                   990             45

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com