सुखदवार्ता : 125 अनाथांच्या आरोग्याचे साधन बनले 15 हजार झाडे 

अचलपूर : झाडाच्या सावलीत बसलेली मुले.
अचलपूर : झाडाच्या सावलीत बसलेली मुले.

अचलपूर(अमरावती) : जन्मापासूनच अंधारयात्रेत भरकटलेल्या अंध, अपंग, मतिमंद बालकांचे पालकत्व स्वीकारून त्यांचे नंदनवन साकारलेल्या मुलामुलींच्या हातून चक्क एक जंगलच निर्माण व्हावा, हे ऐकून आपण थक्क व्हाल. परंतु त्यांनी पंधरा हजार झाडांचे अरण्य सातपुडा पर्वताच्या पायथ्याशी साकारले आहे. सुप्रसिद्ध समाजसेवक शंकरबाबा पापळकर या अनाथांच्या नाथाने तसेच त्यांच्या मुलांनी ही किमया करून दाखविली. परतवाडा येथून अवघ्या सहा-सात किलोमीटरवर असलेल्या वज्झर येथे 125 अनाथ बालकांनी ही अशक्‍यप्राय बाब यशस्वी करून दाखविली आहे. सध्या हीच झाडे कोरोनाच्या संकटात अनाथाश्रमातील मुलांसाठी आरोग्याचे साधन बनले आहेत. 

मुलांनी लावली झाडे 
कोरोनाच्या संकटात शंकरबाबांच्या 125 अंध, अपंग, दिव्यांग मुलांच्या अनोख्या परिवारासाठी हेच अरण्य आता जगण्याचे साधन बनले आहे. कारण या वज्झरच्या अनाथाश्रमात आहेत कडुनिंब, साग, आवळा, सीताफळ, चिक्कू, करवंद, लिंबू, तेंदू, रक्तचंदन, लवंग, विलायची आदी फळे देणारी झाडे. सोबतच अनेक वनौषधीयुक्त झाडेही आहेत. यापेक्षाही महत्त्वाची बाब म्हणजे जवळपास सहा-सात वर्षांपूर्वी बाबांनी विशिष्ट प्रकारच्या गोंदाचे उत्पादन देणाऱ्या कढई प्रजातीची शेकडो झाडे लावली आहेत. या झाडांचा गोंद बाजारात दहा हजार रुपये किलोने विकला जातो. विशेष म्हणजे हा गोंद गर्भवती महिलांच्या सुदृढ आरोग्याकरिता अत्यंत उपयुक्त असल्याचे मानले जाते. सध्या या झाडाला कमी प्रमाणात गोंद येणे सुरू झाल्याची माहिती आहे. मोठ्या प्रमाणात गोंद येणे सुरू झाले की दरवर्षी येथे गोंदविक्री करण्यात येईल. 

झाडांची निगा राखतात मुले 

सध्या या अनाथाश्रमातील लहान-मोठ्या वृक्षांची संपूर्ण निगा आश्रमातील हीच मूकबधीर मुले राखतात. त्याकरिता प्रत्येक मुलाच्या नावाने झाड वाटून देण्यात आले आहे. पाणी टाकण्याच्या डबक्‍यांवरसुद्धा या बालकांची नावे टाकली असून ते स्वत:च्या नावाची डबकी उचलून ती पाण्याने भरून झाडांना पाणी घालतात. दररोज सकाळी तीन तास आणि सायंकाळी तीन तास असे रोज सहा तास ही बालके येथील वृक्षांची निगा राखतात. ही झाडेच आपला परिवार असून तीच आपल्यावर मायेचा हात ठेवतात, हे या मुलांच्या मनावर बाबांनी बिंबवले आहे. त्यामुळे या मुलांना येथील वृक्षराजीचा आणि त्यावर किलबिलाट करणाऱ्या पाखरांचा लळा लागला आहे. ही झाडे जगली तर चार पैसे मिळून 125 जणांच्या परिवाराचा गाडा चालेल हे वास्तव या मुलांना कळून चुकले आहे. 

265 प्रजातीची झाडे 

या कुटुंबाच्या अथक परिश्रमातून 265 प्रजातींच्या पंधरा हजार झाडांचं वज्झरचं अरण्य पर्यावरण समतोलातही अतिशय महत्त्वाची भूमिका पार पाडत आहे. शंकरबाबांवर जिवापाड प्रेम करणारी ही मतिमंद, अंध, अपंग मुले आज स्वत: निर्माण केलेल्या अनाथारण्याच्या प्रेमात पडली आहेत. दहा-बारा वर्षांपूर्वी लावलेल्या रोपांचे आज वन उभे झाले आहे. त्यामुळे आता ही झाडे अनाथाश्रमाच्या उत्पन्नासोबत जगण्याचे एक साधनही बनली आहेत. सर्वांच्या मेहनतीने वाढलेल्या जंगलाचा त्यांना जिव्हाळा वाटू लागला आहे, याच वृक्षराजीत शंकरबाबा आपल्या चंद्रमोळी झोपडीत राहतात कोरोनाच्या संकटातही बाबांनी सर्व मुलांना येथील झाडांच्या पालांचा धूर करून व आयुर्वेदिक सॅनिटायझर बनवून आरोग्याची काळजी घेतली आहे. त्यामुळे कोरोनाच्या संकटात आश्रमातील अंध, अपंग मुले सुखरूप असून हीच विविध प्रजातींची पंधरा हजार झाडे अनाथाश्रमातील मुलांसाठी आरोग्याचे साधन बनली आहेत. 

संपूर्ण देश कोरोनाच्या संकटात सापडला आहे. अशातच या मुलांच्या आरोग्याची काळजी घेणे आवश्‍यक होते, त्यासाठी दररोज सकाळ-संध्याकाळ निंबाच्या पाल्याचा धूर करून व सॅनिटायझर म्हणून 20 किलो निंबाच्या पाल्यापासून आयुर्वेदिक सॅनिटायझर तयार केले. याच सॅनिटायझरने व दररोज दोन्ही वेळा धूर करून मुलांच्या आरोग्याची काळजी घेतल्या जात आहे. त्यामुळे आज मुले सुरक्षित आहेत. 
- शंकरबाबा पापळकर, वज्झर. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com