आनंदाची वार्ता : नाफेडच्या चणा खरेदीला मुदतवाढ ; भूमिपुत्र संघर्ष वाहिनीच्या लढ्याला यश 

file photo
file photo

वर्धा : शेतकऱ्यांजवळील साठा पाहता नाफेडच्या चणा खरेदीला मुदतवाढ देण्यात आली आहे. आता चणा खरेदी 15 जुलैपर्यंत होणार आहे. या संदर्भात भूमिपुत्र संघर्ष वाहिनीने दिलेल्या लढ्याला यश आल्याचे वाहिनीचे संस्थापक अध्यक्ष अभिजित फाळके यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे. 

हे वाचा— नागपूरचा तरुण करतोय अमेरिकेच्या कोरोना योद्धांची मदत; तयार केले कवच...
यावर्षी कृषी विभागाने पणन विभागाला दिलेले अपेक्षित सरासरी चणा उत्पादन आणि शेतकऱ्यांना झालेले उत्पादन यात खूप तफावत आहे. जिल्ह्यात सरासरी चणा उत्पादन हेक्‍टरी 17 क्विंटल झाले असून, कृषी विभागाने पेरणीच्या वेळी सुचवलेला अंदाज हा केवळ 928 किलो प्रती हेक्‍टर इतकाच होता. त्यामुळे पणन विभागाने नाफेडमार्फत शेतकऱ्यांकडून प्रती हेक्‍टरी 928 किलोच चणा खरेदी केला. त्यात कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर अनेक संकटे येत ही खरेदी अतिशय संथगतीने सुरू होती. दिवसाला आठ ते 10 शेतकऱ्यांचाच माल घेणे सुरू होते. वर्धा विभागात एक हजार 400 शेतकऱ्यांनी चणा विक्रीसाठी नोंदणी केली होती, जी 15 जूनपर्यंत पूर्ण होणे शक्‍य नव्हते. 

या अनुषंगाने शेतकऱ्यांनी आपली समस्या भूमिपुत्र संघर्ष वाहिनीसमोर मांडली. वाहिनीतर्फे योगेश घोगरे, सचिन घोडे, प्रवीण काटकर, विवेक लोहकरे यांनी शेतकऱ्यांच्या अडचणींचे निवेदन जिल्हा पणन अधिकारी शेख बिलाल यांना दिले. वाहिनीचे संस्थापक अध्यक्ष अभिजित फाळके यांनी जिल्हाधिकारी विवेक भीमनवार, पालकमंत्री सुनील केदार यांच्याशी संपर्क साधत शेतकऱ्यांच्या व्यथा मांडल्या. यानंतर पणनमंत्री बाळासाहेब पाटील यांना खरेदीची मुदत व प्रती हेक्‍टर चणा खरेदीची मर्यादा वाढविण्याची विनंती केली. स्टेट मार्केटिंग बोर्डचे व्यवस्थापकीय संचालक योगेश म्हसे यांच्याशी संपर्क साधून शेतकऱ्यांच्या नुकसानाची माहिती दिली. या प्रयत्नांची दखल घेत पणनमंत्री बाळासाहेब पाटील यांनी चणा खरेदीला आता 15 जुलैपर्यंत मुदतवाढ दिली आहे. चणा खरेदीला वेग आला असून, दिवसाला 50 शेतकऱ्यांचा चणा वर्धा कृषी उत्पन्न बाजार समितीत खरेदी केला जात आहे. 

आता प्रती हेक्‍टरी 16 क्विंटल चणा खरेदी व्हावा, याकरिता भूमिपुत्र संघर्ष वाहिनी लढा देत आहे. पणनमंत्री बाळासाहेब पाटील, पालकमंत्री सुनील केदार यांच्याशी संपर्क साधला जात आहे. शासनाने आमच्या लढ्याची दखल घेत चणा खरेदीची मुदत आणि वेग वाढविल्याने शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे. 
-अभिजित फाळके, संस्थापक अध्यक्ष, भूमिपुत्र संघर्ष वाहिनी 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com