गोरेवाडा प्राणिसंग्रहालयाचे उद्‌घाटन सप्टेंबरमध्ये

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 29 जुलै 2019

नागपूर : गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणिसंग्रहालयाचे उद्‌घाटन सप्टेंबर महिन्यात करण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. यामुळे वन्यप्रेमी व पर्यटकांना वन्यप्राणी आणि पक्षी पाहण्यासाठी सिंगापूरला जावे लागणार नाही, असेही ते म्हणाले.

नागपूर : गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणिसंग्रहालयाचे उद्‌घाटन सप्टेंबर महिन्यात करण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. यामुळे वन्यप्रेमी व पर्यटकांना वन्यप्राणी आणि पक्षी पाहण्यासाठी सिंगापूरला जावे लागणार नाही, असेही ते म्हणाले.
हिंगणा-वाडी रोडवरील मनपाच्या हॉट मिक्‍स प्लांटजवळील परिसरात अंबाझरी जैवविविधता उद्यानाच्या लोकार्पण सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, वनमंत्री सुधीर मुनगंटीवार, पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, वनराज्यमंत्री परिणय फुके, महापौर नंदा जिचकार, प्रधान मुख्य वनसंरक्षक (वनबलप्रमुख) उमेशकुमार अग्रवाल, सचिव (वने) विकास खारगे उपस्थित होते.
अंबाझरी जैवविविधता उद्यानाचे मुख्यमंत्री म्हणून चार वर्षांपूर्वी भूमिपूजन केले होते. आता मुख्यमंत्री म्हणूनच लोकार्पण करीत आहे. हे फक्त आमच्या सरकारमध्येच शक्‍य होऊ शकते. इतर पक्षांचे मुख्यमंत्री दीर्घ कालावधीपर्यंत टीकतच नाही, हा अनुभव असल्याचे सांगत मुख्यमंत्र्यांनी विरोधकांवर टीकास्त्र सोडले. राज्य सरकारने 33 कोटी वृक्षलागवडीचा संकल्प केला आहे. तो संकल्प पूर्ण होत आहे. नागरिकांकडून मोहिमेला चांगला प्रतिसाद मिळतो आहे. पूर्वीच्या पिढींनी वनाचे महत्त्व ओळखले नाही. त्यामुळे जंगलतोड झाली. आताची पिढी पर्यावरणप्रेमी आणि विद्यार्थी वृक्षांचा ऱ्हास भरून काढतील, असेही मुख्यमंत्री म्हणाले.
वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचेही भाषण झाले. तत्पूर्वी, अंबाझरी जैवविविधता उद्यानाचा लोगो तयार करणाऱ्या आर्या निमजे आणि ई सायकल तयार करणाऱ्या प्रज्वल टेंभूर्णी यांचा शाल व श्रीफळ आणि प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला. तसेच अंबाझरी बर्ड या पुस्तकाचे प्रकाशन प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आले. प्रास्ताविक वनराज्यमंत्री परिणय फुके यांनी तर सहायक वनसंरक्षक राजेश तलमले यांनी आभार मानले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Gorewada Zoo inaugurated in September