गोसावी समाजातील ३१ शाळाबाह्य बालकांचे ‘ॲडमिशन’

चांपा - शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आलेल्या शाळाबाह्य बालकांसोबत शिक्षिका  आणि संवेदनशील नागरिक.
चांपा - शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आलेल्या शाळाबाह्य बालकांसोबत शिक्षिका आणि संवेदनशील नागरिक.

चांपा (ता. उमरेड) - ‘सकाळ’ प्रतिनिधीचा संवेदनशील पुढाकार, स्थानिक सामाजिक कार्यकर्ते, समंजस नागरिक आणि शिक्षण विभागाच्या तातडीच्या प्रतिसादामुळे कधीही शाळेचे  तोंड न पाहिलेले ३१ बालके आजपासून शाळेत जाऊ लागले.  

भटकंती करत-करत गोसावी समाजबांधवांनी चांपा येथे तंबू ठोकले. भविष्य सांगत फिरणे आणि मिळेल त्यात गुजराण करणे. चिले-पिलेही सोबत. त्यामुळे त्यांनी शाळा कधी पाहिलीच नाही. त्यांची कळकटलेली कपड्यातील ‘काही-बाही’ खेळणारी मुळे चांपा येथील ‘सकाळ’चे बातमीदार अनिल पवार यांना दिसली.

शाळाबाह्य बालकांना शाळेत प्रवेश देण्याच्या ‘सकाळ’च्या ‘शाळेत  नेऊ सर्वांना’  या अभियानात ते ‘सकाळ-चमू’ सोबत विदर्भभर फिरले होते. त्यातून त्यांच्यामध्ये बालकांच्या शिक्षणाची जाण निर्माण झाली होती. ते थेट त्या गोसावी समाजाच्या वस्तीत धडकले आणि तेथून सुरू झाली या शाळाबाह्य बालकांच्या प्रवेशाची प्रक्रिया. चांपा येथील मुख्याध्यापकांशी त्यांनी भेट घेतली.

शाळाबाह्य बालके आहेत, हे त्यांच्या लक्षात आणून दिले. ‘आरटीई’अंतर्गत शाळाबाह्य बालकांच्या प्रवेशासाठी कोणताही जन्माचा दाखला किंवा  प्रमाणपत्राची गरज नसते, हे त्यांनी सांगितले. हळदगाव येथील सरपंच नागसेन निकोसे, पाचगावचे माजी सरपंच महानंद गायकवाड यांनीही गोसावी समाजबांधवांना समजावले. शिक्षिका चंदा महादेवराव गायकवाड व सहाय्यक शिक्षिका सारिका भास्कर वेलके याही पालकांसोबत बोलल्या. बालकांचीही आस्थेने विचारपूस केली. निरासग बालकांनी शाळेत जाण्यासाठी होकार भरला. त्यातून तडकाफडकी प्रक्रिया करण्यात आली.

भाषेची अडचण, उदरनिर्वाहासाठी भटकंती यामुळे गोसावी समाजाचीच नव्हे तर अनेक भटक्‍या विमुक्त समाजातील बालके शाळेतच जात नाहीत. गेलीच तर विविध सामाजिक कारणांमुळे त्यांच्या शिक्षणाचे दोर अचानक कापले जातात. सरकारने अशा बालकांच्या शाळा प्रवेशासाठी धडक मोहीम राबवावी. 
- मिलिंद सोनुने, नाथजोगी समाजातील कार्यकर्ते

शैक्षणिक साहित्य कुठून मिळणार? 
गणवेश आणि पाठ्यपुस्तके देण्याचे आश्‍वासन शिक्षण विभागाने दिले. तरी नोटबुक, पाट्या,  स्कूल बॅग्स आणि इतर शैक्षणिक साहित्याचे प्रश्‍न कायमच आहे.  

शिक्षण हमी कार्ड देणार 
‘सकाळ’च्या शाळेत नेऊ सर्वांना मोहिमेअंतर्गत तब्बल ४५०० बालके शाळेत दाखल केली  होती. भटकंती करणाऱ्या पालकांना ‘शिक्षण हमी कार्ड’ वितरण करण्याचा राज्यातील पहिला कार्यक्रम भंडारा जिल्ह्यातील गिरोला येथील वडार वस्तीवर आणि दुसरा कार्यक्रम  नागपूरनजीकच्या बोखारा येथे ‘सकाळ’च्या पुढाकारातून झाला होता. चांपा येथील बालकांनाही शिक्षण हमी कार्ड देण्याचे शिक्षण विभागाने ‘सकाळ’ प्रतिनिधीला आश्‍वासन दिले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com