हे "डोरेमॉन' सरकार!

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 5 डिसेंबर 2016

नागपूर - राज्य सरकार कार्टुन चॅनेलवरील "डोरेमॉन'च्या कार्टुन व्यक्‍तिरेखेसारखे असल्याचा आरोप विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी आज पत्रकार परिषदेत केला.

नागपूर - राज्य सरकार कार्टुन चॅनेलवरील "डोरेमॉन'च्या कार्टुन व्यक्‍तिरेखेसारखे असल्याचा आरोप विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी आज पत्रकार परिषदेत केला.

विधिमंडळ अधिवेशनाच्या पार्श्‍वभूमीवर मुख्यमंत्र्यांच्या चहापानावर विरोधी पक्षांनी बहिष्कार घातला. त्यानंतर विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे व विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेतली. सरकार म्हणजे "डोरेमॉन' आणि जनता म्हणजे "नोबिता' अशी टीका विखे यांनी केली. "डोरेमॉन' आभासी जगात नेऊन मित्राची सुटका करतो. त्याप्रकारे राज्य सरकारही प्रत्येक समस्येवर काहीतरी थातूरमातूर उपाययोजना करून वेळ मारून नेत असल्याचे ते म्हणाले.

मराठा आरक्षणाबाबत सकारात्मक चर्चा करून मार्ग काढण्याऐवजी सरकार दोन समाजांमध्ये दुही निर्माण करून "फोडा व झोडा' नीतीचा वापर करत असल्याचा आरोप मुंडे व विखे-पाटील यांनी केला.

मराठा आरक्षणावरून सरकारकडून दोन समाजांत भांडणे लावण्याचे काम करत असल्याचे सांगून विखे-पाटील म्हणाले,'"नोटाबंदीमुळे जनतेला त्रास सहन करावा लागत आहे. काही उद्योजकांचे कर्ज माफ करायचे व सर्वसामान्यांना बॅंकेतून पैसे काढण्यासाठी बंदी टाकायची? यावरून सरकार कुणाचे भले करत आहे, हे स्पष्ट होते. नोटाबंदीमुळे अनेकांचे प्राण गेल्याने राज्य सरकारवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा.'' नोटाबंदीमुळे राज्यातील सहकारी बॅंकांचे सर्व व्यवहार ठप्प पडल्याचा आरोप त्यांनी केला.

नागपुरातील कायदा व सुव्यवस्था कोलमडली असून, गुन्हेगारीचा आलेख वाढत आहे. बिहारपेक्षाही भयंकर स्थिती नागपूरची असल्याचा आरोप मुंडे यांनी केला. नागपुरात गुन्हेगार फूलटाइम काम करत असल्याचा टोलाही त्यांनी मारला.

सावरांना आवरा
राज्यात बालमृत्यू होण्याच्या संख्येत वाढ झाली. आदिवासी मुले कुपोषणाने मरतच असतात, असे निवेदन करून आदिवासींच्या दुःखावर मीठ चोळण्याचे काम आदिवासी विकासमंत्री विष्णू सावरा करत आहेत. यामुळे आदिवासीमंत्र्यांना गावात जाण्यासाठी राज्य सरकारला संचारबंदी घोषित करावी लागते, ही लाजिरवाणी बाब असल्याचे विखे-पाटील यांनी सांगितले. या सावरांना आवरण्याची वेळ आल्याचा टोमणा विखे-पाटील यांनी मारला.

Web Title: This government is Doraemon